पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी गुन्हे शाखेचे आत्माजी सावंत यांनी स्वीकारला पदभार

पवई पोलीस ठाण्यात पदभार स्वीकारल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत

महानगर मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने मुंबई पोलीस दलात महत्त्वाचे प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. गुन्हे शाखेत उल्लेखनीय कामगिरी करणारे आणि विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले ज्येष्ठ पोलीस अधिकारी आत्माजी शिवाजी सावंत यांनी नुकताच पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी (Sr. PI) अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे. गुन्हेगारीचे जाळे उद्ध्वस्त करण्यात आणि क्लिष्ट गुन्ह्यांचा शोध घेण्यात त्यांचा मोठा हातखंडा मानला जातो. पवई परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्यासोबतच या परिसरात अंमली पदार्थ आणि नशाखोरी रोखण्यावर त्यांचे विशेष लक्ष असणार आहे.

पवई येथे रुजू होण्यापूर्वी आत्माजी सावंत यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि अँटी-नारकोटिक्स सेलमध्ये (घाटकोपर युनिट) दीर्घकाळ अत्यंत उल्लेखनीय सेवा बजावली आहे. आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात संघटित गुन्हेगारी, अंमली पदार्थांचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करणे आणि आव्हानात्मक तपासांमध्ये त्यांनी आपली चमकदार बुद्धिमत्ता व धाडस दाखवले आहे. त्यामुळेच संवेदनशील व हाय-प्रोफाईल प्रकरणांच्या तपासासाठी पोलीस दलात त्यांच्याकडे अत्यंत विश्वासाने पाहिले जाते.

त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीतील एक सर्वात मोठी कामगिरी म्हणजे पाच वर्षे जुनी ‘कोल्ड केस’ यशस्वीरीत्या उघडकीस आणणे. सुरुवातीला एका दुर्दैवी रस्ता अपघाताची घटना म्हणून नोंदवल्या गेलेल्या प्रकरणाचा सावंत यांच्या पथकाने सखोल तपास केला. अत्याधुनिक फॉरेन्सिक पुरावे, बातमीदारांचे जाळे आणि तपासाच्या कौशल्याच्या जोरावर हा अपघात नसून आर्थिक वादातून कटकारस्थानपूर्वक खून केल्याचे सिद्ध केले. या कारवाईमुळे चार प्रमुख आरोपी गजाआड झाले आणि आशेचा किरण गमावलेल्या पीडित कुटुंबाला शेवटी न्याय मिळाला.

हत्या आणि गंभीर गुन्ह्यांव्यतिरिक्त, मुंबईतील अंमली पदार्थविरोधी मोहिमेतही सावंत यांनी आघाडीवरून नेतृत्व केले आहे. महाराष्ट्रातील कोट्यावधी रुपयांच्या बेकायदेशीर ड्रग्ज कारखान्यांवर छापे मारून त्यांनी स्थानिक पातळीवरील ड्रग्ज पुरवठ्याचे साखळी रॅकेट उद्ध्वस्त केले आहे.

आयआयटी बॉम्बेसारखी नामांकित शैक्षणिक संस्था, गजबजलेली कॉर्पोरेट संकुले आणि मोठी निवासी क्षेत्रे असलेल्या पवई भागात सायबर गुन्हेगारी रोखणे व महिला – नागरिकांची सुरक्षा ही मुख्य जबाबदारी आहेच. सोबतच या परिसरात नशाखोरी आणि अमली पदार्थ रोखण्यासाठी विशेष कार्य करणार असल्याचे सावंत यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सावंत यांच्या नियुक्तीचे जोरदार स्वागत केले आहे. पदभार स्वीकारताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांनी गुन्हेगारीला आळा घालणे, नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करणे आणि पोलीस व जनता यांच्यातील संवाद अधिक मजबूत करण्यावर आपला भर असेल, असा विश्वास व्यक्त केला.

, , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!