पवई येथे प्रस्तावित असलेल्या ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर’ (GCC) आणि मोठ्या व्यावसायिक प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या नागरी समस्यांसंदर्भात ‘पवई ॲक्शन फोरम’च्या (PAF) शिष्टमंडळाने सोमवार, २८ सप्टेंबरला मुंबई महापालिका मुख्यालयात पालिका आयुक्त अश्विनी भिडे (भा.प्र.से.) यांची भेट घेतली.
शिष्टमंडळात डॉ. रतन शारदा, रमेश रथ, विकास गुप्ता, शोभा फिलिप्स, वंदना दिवाण, अनिर्बान बॅनर्जी आणि जयमन खोना यांचा समावेश होता. या १५ मिनिटांच्या सकारात्मक बैठकीला महापालिकेचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
यावेळी स्थानिक रहिवाशांच्या २,००० हून अधिक स्वाक्षऱ्यांचे निवेदन आयुक्तांना सादर करण्यात आले. सुमारे ३०,००० आसनक्षमतेच्या या प्रस्तावित प्रकल्पामुळे दररोज १ लाखांहून अधिक लोकांची वर्दळ आणि २० ते २५ हजार वाहनांची भर पडणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
परिसरातील अंतर्गत ६० फुटी रस्ते, केवळ २,५०० वाहनांसाठी उपलब्ध असणारे अपुरे पार्किंग आणि हिरानंदानी हॉस्पिटलसारख्या आपत्कालीन सेवांवर होणारा परिणाम यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. तसेच शाळकरी विद्यार्थ्यांची सुरक्षितता, पाणीपुरवठा, मलनिस्सारण व्यवस्था आणि पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधत स्वतंत्र व सर्वसमावेशक पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी फोरमने यावेळी केली.



No comments yet.