पवई येथील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण ३,४३,५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवार, २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेपाच ते सव्वासात या अवघ्या अडीच तासांच्या कालावधीत घडली.
तक्रारदार लक्ष्मी कोडते (वय ३९) या घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्या टाटा पॉवर ट्रान्झिट कॅम्प येथे त्यांचे पती व मुलगा यांच्यासह राहतात. मुलगा हा फुटबॉल प्रशिक्षक असून पती विक्रोळी येथे बांधकाम क्षेत्रात नोकरी करतात.
रविवारी सकाळी कोडते व त्यांचे पती नेहमीप्रमाणे आपापल्या कामावर निघून गेले होते. दरम्यान, त्यांच्या भावाचा मुलगा दुपारी त्यांच्या घरी आला होता. सायंकाळी साधारण ४:४५ वाजता मुलगा आणि भाचा दोघेही घराला कुलूप लावून बाहेर पडले.
सायंकाळी सुमारे ७:१५ वाजता तक्रारदारांचे पती कामावरून परतले असता, त्यांना घराचा दरवाजा उघडा आणि कुलूप गायब असल्याचे दिसले. घरात जाऊन पाहिले असता कपाट उघडून आतील लॉकर फोडण्यात आले होते. त्यांनी तत्काळ ही माहिती पत्नी व मुलाला दिली. लक्ष्मी यांनी घरी येऊन कपाटाची पाहणी केली असता, कपाटात ठेवलेले दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.
चोरीला गेलेला मुद्देमाल:
चोरट्यांनी २० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस (किंमत ₹९०,०००), २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (किंमत ₹९०,०००), २० ग्रॅमचे सोन्याचे गंठण (किंमत ₹९०,०००), ५ ग्रॅम वजनाची कानातली दोन जोड (किंमत ₹२२,५००), सोन्याची अंगठी (किंमत ₹१५,७५०), लहान बाळाचे सोन्याचे मनगट मणी (किंमत ₹९,०००), कानातील टॉप्स (किंमत ₹४,५००), ७० ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण (किंमत ₹८,२२५), ३० ग्रॅमचे चांदीचे कडे (किंमत ₹३,५२५) आणि १० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ३ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
या प्रकरणी पवई पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३३१(३), ३३१(४) (घरफोडी) आणि कलम ३०५ (घरामध्ये चोरी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पवई पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



No comments yet.