हिरानंदानीत ‘मिस्टरी’ घरफोडी! ना दरवाजा तोडला, ना कपाट; १७ व्या मजल्यावरून २९ तोळे सोने, रोकडची चोरी

मुंबईतील अत्यंत सुरक्षित आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पवई, हिरानंदानी गार्डन्स परिसरामध्ये एक धक्कादायक आणि मोठी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. येथील ‘इटर्निया’ या इमारतीमधील १७ व्या मजल्यावरील एका फ्लॅटमधून अज्ञात चोरट्याने कपाटातून तब्बल २९ तोळे सोन्याचे दागिने आणि ७ लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण २५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०५(ए) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ४३ वर्षीय तक्रारदार या पवई येथील एका नामांकित कंपनीत नोकरी करतात. त्या पती आणि दोन मुलांसह हिरानंदानी गार्डन्समधील इटार्निया इमारतीत गेल्या एका वर्षापासून वास्तव्यास आहेत. तक्रारदार यांच्या आजीची गुजरातमधील वडिलोपार्जित जमीन विकल्यानंतर त्यांच्या वाट्याला आलेली ७ लाख रुपयांची रोकड त्यांनी त्यांच्या बेडरूममधील लाकडी कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवली होती. याव्यतिरिक्त, त्यांनी नोकरीदरम्यान बोनस व बचतीमधून खरेदी केलेली एचडीएफसी (HDFC) बँकेची प्रत्येकी १० ग्रॅम वजनाची २० सोन्याची नाणी (एकूण २०० ग्रॅम), लग्नातील व आईने दिलेल्या ८ सोन्याच्या बांगड्या (२० ग्रॅम), सोन्या-हिऱ्यांचे कानातले दागिने (२ तोळे), दोन ब्रेसलेट (१ तोळा), दोन सोन्याच्या चैन (२ तोळे) आणि प्रत्येकी दोन तोळ्यांची दोन सोन्याची मंगळसूत्रे असा मौल्यवान ऐवज कपाटात सुरक्षित ठेवला होता.

तक्रारदार यांनी पोलिसांना दिलेल्या जवाबानुसार, २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता वाढदिवस साजरा करण्यासाठी मुंबई बाहेर जाण्यापूर्वी त्यांनी कपाटातील सर्व रोकड आणि दागिने व्यवस्थित असल्याचे तपासले होते. त्यानंतर त्यांनी कपाट व्यवस्थित लॉक करून त्याची चावी लॅपटॉपच्या बॅगेत ठेवली होती. २९ ऑगस्ट रोजी संपूर्ण कुटुंब भंडारदरा येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले आणि ३० ऑगस्ट रोजी दुपारी मुंबईत परतले. त्यानंतर दैनंदिन कामाच्या व्यस्ततेमुळे कपाटाकडे कोणाचे लक्ष गेले नाही. मात्र, १५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे आठ ते साडेआठच्या सुमारास कुटुंबीय बाहेर जेवणासाठी जाणार असल्याने आरती यांनी कपाट उघडले. त्यावेळी ड्रॉवरमधील सोन्याचे दागिने आणि ७ लाख रुपयांची रोकड गायब असल्याचे पाहून त्यांना प्रचंड धक्का बसला.

“त्यांनी तत्काळ पती आणि घरात पूर्णवेळ काम करणाऱ्या मदतनीस यांच्याकडे विचारणा केली, परंतु दोघांनाही याबद्दल कोणतीही माहिती नव्हती. संपूर्ण घरात कसून शोध घेण्यात आला, मात्र काहीही हाती लागले नाही. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच १६ सप्टेंबर रोजी, घरातील बाथरूमचे ड्रेनेज तुंबल्याने स्वयंपाकी महिला यांनी आउटलेटची तपासणी केली. त्यावेळी पाण्याच्या पाइपलाइनमधून एचडीएफसी बँकेच्या सोन्याच्या बिस्किटांची तीन रिकामी प्लास्टिक पाकिटे आढळून आली. ही पाकिटे पाहताच चोरीला गेलेल्या सोन्याच्या नाण्यांचीच असल्याचे स्पष्ट झाले आणि घरातच चोरी झाल्याची खात्री पटली,” असे पवई पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “घरातील कोणीतरी जवळच्या व्यक्तीने किंवा कर्मचाऱ्याने ही चूक केली असावी आणि ते दागिने पुन्हा आणून ठेवतील, या आशेपोटी तक्रारदारांनी सुरुवातीला काही दिवस पोलिसांत तक्रार करण्याचे टाळले. मात्र बराच काळ उलटूनही मुद्देमाल परत न मिळाल्यामुळे अखेर त्यांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेऊन औपचारिक फिर्याद दिली.”

चोरट्याने घराचे किंवा कपाटाचे कुलूप न फोडता किंवा कोणतीही तोडफोड न करता मोठ्या कुशलतेने घरातील मौल्यवान वस्तूंवर हात साफ करत चोरी केली असल्याने नक्की चोरी केली कशी असा प्रश्न आता तपासी अधिकाऱ्यासमोर आहे.

पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पवई पोलीस या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

“इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज, संशयित व्यक्तींच्या हालचाली आणि घरगुती कर्मचाऱ्यांची कसून चौकशी सुरू आहे. काही काळ इमारतीचे सीसीटीव्ही बंद असल्याची देखील माहिती समोर येत आहे, त्यामुळे चोरट्याला याबाबत माहिती होती. याचाच फायदा घेवून त्याने डाव साधला असल्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे तपासी अधिकाऱ्याने सांगितले.

या प्रकरणात पूर्वी कामावर असलेल्या एका मदतनीसवर देखील संशय व्यक्त केला जात आहे. कामाच्या वेळेत ती घरात इन्स्टाग्राम रील्स आणि व्हिडिओ बनवत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिला कामावरून काढून टाकण्यात आले होते. कामावरून काढल्यावर तिच्याकडे घराची मुख्य चावी राहिली होती आणि वारंवार मागूनही तिने ती चावी परत केली नव्हती. त्यामुळे घराच्या चावीचा गैरवापर करून किंवा उघड्या दरवाजाचा फायदा घेऊन कोणीतरी घरात प्रवेश केला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

भरवस्तीत आणि उच्च सुरक्षेच्या संकुलात घडलेल्या या मोठ्या चोरीमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!