पवईतील उपेंद्र त्रिपाठी मार्गावरील कोंडीचा तिढा कायम; प्रशासनाच्या आश्वासनानंतरही सिग्नल हलवला नाही, नागरिक संतप्त

पालिका, वाहतूक विभाग एकमेकांकडे दाखवत आहेत बोट

आयआयटी पवई परिसरातील अंतर्गत वस्त्यांना जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडशी (JVLR) जोडणाऱ्या उपेंद्र त्रिपाठी मार्गावरील उजवे वळण बंद केल्यामुळे निर्माण झालेली समस्या दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालली आहे. वाहतूक पोलीस आणि पालिका प्रशासनाने बैठक घेऊन सिग्नल मागे सरकवण्याचे व रस्ता खुला करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, महिनाभर उलटूनही परिस्थिती जैसे थे असल्याने पवईकरांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. “प्रशासनाने दिलेला शब्द पाळला कुठे?” असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नेमकी काय आहे समस्या?

माधव अपार्टमेंट ते आयआयटी मेन गेटकडे जाणाऱ्या उपेंद्र त्रिपाठी मार्गावरून मुख्य रस्त्यावर (JVLR) येणाऱ्या वाहनांसाठीचे उजवे वळण साकीनाका वाहतूक विभागाने प्रायोगिक तत्त्वावर बंद केले आहे. अंतर्गत मार्गावरून येणारे वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करून विरुद्ध दिशेने गाडी चालवत असल्याने या भागात अपघातांचे प्रमाण वाढले होते, असा दावा वाहतूक पोलिसांनी केला आहे. हे उजवे वळण बंद केल्यामुळे अपघात थांबले असले, तरी स्थानिक नागरिकांना मात्र गांधीनगरच्या दिशेने जाण्यासाठी पवई प्लाझा येथून सुमारे २ ते ३ किलोमीटरचा मोठा वळसा घालून यु-टर्न घ्यावा लागत आहे.

सामान्य नागरिकांचे हाल आणि आर्थिक भुर्दंड

या अंतर्गत रस्त्याचा वापर चैतन्यनगर, तिरंदाज गावठाण, गोखले नगर, रमाबाई नगर आणि सायगल वाडी यांसारख्या मोठ्या लोकवस्त्यांमधील हजारो रहिवासी करतात. रस्ता बंद झाल्याने नोकरदार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक रहिवाशांना तासंतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

स्थानिक नागरिक राम खंदारे यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, “रिक्षाने कांजूरला जाण्यासाठी पूर्वी मेनगेटवरून ३८ रुपये भाडे होत असे, आता द्राविडी प्राणायाम करून जाताना ४७ रुपये मोजावे लागतात. रोजचे १० रुपये अतिरिक्त देणे सामान्य जनतेला परवडणारे नाही. अंतर्गत सुचवलेला पर्यायी रस्ता आगामी गणपती उत्सवात दोन सार्वजनिक गणेशोत्सवांमुळे बंद होईल, मग आम्ही जायचे कुठून?”

या भागात पवई इंग्लिश हायस्कूल, ज्ञानमंदिर शाळा, पालिका शाळा, बॉम्बे पब्लिक शाळा यांसारख्या अनेक शाळा आहेत. शाळांच्या बसेसना या कोंडीमुळे मोठा फटका बसत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, पवई पॉली क्लिनिक, निहाल हॉस्पिटल, आपला दवाखाना आणि हिरानंदानी हॉस्पिटल यांसारखी रुग्णालये याच परिसरात आहेत. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका या कोंडीत अडकल्यास एखाद्या रुग्णाचा जीव गेल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रशासकीय बैठक आणि रखडलेले आश्वासन

नागरिकांचा वाढता रोष पाहून जून महिन्याच्या सुरुवातीला मुलुंड येथे पालिका अधिकारी, वाहतूक पोलीस आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीत साकीनाका वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनी साळुंखे यांनी प्रस्ताव ठेवला होता की, जर येथील वाहतुकीचा सिग्नल काही फूट मागे सरकवून उपेंद्र त्रिपाठी मार्गासमोर आणला आणि दुभाजक (डीवायडर) तोडला, तर अंतर्गत भागातील वाहने सरळ जेविएलआरवर येऊन गांधीनगरकडे जाऊ शकतील.

पालिकेने या प्रस्तावाला मंजुरी दिली होती आणि पालिका कर्मचाऱ्यांनी जागेची मोजमापेही घेतली होती. ८ ते १० दिवसांत हे काम पूर्ण होईल, असे आश्वासन देण्यात आले होते. स्थानिक नगरसेवक चंदन शर्मा यांनीही “नागरिकांच्या समस्येचे निवारण करण्यात यश आले असून लवकरच रस्ता मोकळा होईल आणि झेब्रा क्रॉसिंग बनवले जाईल,” असे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही हा सिग्नल शिफ्ट न झाल्याने नागरिकांचा संयम सुटत चालला आहे.

यासंदर्भात बोलताना साकीनाका वाहतूक विभागाकडून आम्हाला यासंदर्भात कोणतेही पत्र प्राप्त झालेले नसल्याचे पालिका एस विभागाकडून सांगण्यात येत आहे. तर साकीनाका वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनी साळुंखे यांच्याशी संपर्क साधण्याचा पर्यंत केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

‘सोशल मीडियावरील रील्सवाले कुठे गेले?’ – नागरिकांचा संतप्त सवाल

प्रशासनाच्या दिरंगाईवर स्थानिक नागरिकांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष जमिनीवर नागरिकांच्या प्रतिक्रिया अत्यंत तीव्र आहेत:

  • राहुल कदम: “आधी कृत्रिम वाहतूक कोंडी निर्माण करायची, नागरिकांना तासंतास ट्रॅफिकमध्ये अडकवायचं आणि त्यानंतर त्याच ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांकडून दंड वसूल करायचा – हा नेमका कोणता कारभार? वाहतूक नियोजन शून्य, नागरिकांचा वेळ वाया, इंधनाची नासाडी आणि मानसिक त्रास – याची जबाबदारी कोण घेणार? प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा, सामान्य जनतेला हलक्यात घेण्याचे दिवस आता संपले आहेत.”
  • अमोल चव्हाण: “आठवड्याभरात रस्ता उघडणार होते, सिग्नल मागे घेणार होते त्याचे काय झाले? मोठमोठे रील सोशल मीडियावर पाहिले, समस्येचे समाधान करण्यासाठी आंदोलन करणारे आणि शब्द देणारे आता कुठे गेले? जनतेची लढाई जनतेलाच करावी लागणार आहे, नाहीतर असंच तोंड दाबून बुक्क्याचा मार खाण्यात धन्यता मानावी लागेल.”

पावसाळ्याचे कारण पुढे येण्याची भीती

भारतीय हवामान खात्याच्या (IMD) नव्या अंदाजानुसार जुलै महिन्यात कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावर बोलताना स्थानिकांनी सांगितले की, “पावसाळ्यात पालिका खड्डे किंवा रस्ते खणत नाही, असे कारण पुढे करून प्रशासन पुन्हा ३ महिने वेळकाढूपणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था (NGO) आणि सामान्य पवईकरांनी आता एकत्र येऊन प्रशासनावर दबाव आणण्याची गरज आहे, तरच हा प्रश्न लगेच सुटेल.”

मोठ्या आंदोलनाचा इशारा

तोडगा निघूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक रहिवाशांनी “एकत्रितपणे जोर का झटका” दाखवण्याची म्हणजेच मोठ्या जनआंदोलनाची तयारी सुरू केली आहे.

आता पालिका आणि वाहतूक पोलीस पावसाचे कारण पुढे करत हा प्रश्न रेंगाळत ठेवतात की दिलेल्या आश्वासनाची त्वरित पूर्तता करून पवईकरांना दिलासा देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!