बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) क्षेत्रातील प्रमुख कृत्रिम तलावांपैकी एक असलेला पवई तलाव, मुंबई शहरात झालेल्या मुसळधार पावसानंतर बुधवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास ओसंडून वाहू लागला आहे.
या तलावाची साठवण क्षमता ५४५ कोटी लिटर असून त्याचा वापर केवळ औद्योगिक कामांसाठी केला जातो. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम दर्शवत, तलाव भरून वाहू लागला आहे.
पवई तलाव हा बीएमसीद्वारे देखरेख केल्या जाणाऱ्या प्रमुख जलाशयांपैकी एक आहे. जरी तो शहराच्या पिण्याच्या पाणीपुरवठा प्रणालीचा भाग नसला तरी, औद्योगिक पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यात तो महत्त्वाची भूमिका बजावतो. मुंबईत मुसळधार पावसामुळे महानगर क्षेत्रातील तलाव आणि जलाशयांमधील पाण्याची पातळी वाढत असतानाच हा ओव्हरफ्लो झाला आहे.
महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, तलाव पूर्ण साठवण क्षमतेपर्यंत पोहचल्यानंतर पहाटे अंदाजे ५.३० वाजता तो ओव्हरफ्लो होऊ लागला.
पवई तलाव ओसंडून वाहू लागल्याने पर्यटकांमध्ये आनंद असला तरी पर्यावरण प्रेमी मात्र नाराज आहेत. जोरदार पावसानंतरही ऑगस्ट महिन्यात भरून वाहणारा तलाव गेल्या काही वर्षात जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच ओव्हरफ्लो होत आहे. केवळ सुरुवातीच्या पावसातच तो ओसंडून वाहू लागला असून, ही चिंतेची बाब असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
“करोडो रुपये खर्च करून पवई तलावातील जलपर्णी हटवणे, गाळ उपसण्याचे काम करण्यात आले आहे. मात्र यानंतर देखील तलावाची पातळी अजूनच कमी झाली आहे आणि त्यामुळे थोड्या पावसातही तलाव ओव्हरफ्लो होत आहे”, असे यावेळी बोलताना पर्यावरण प्रेमी म्हणाले.



No comments yet.