पवई येथील एनएसजी कॅम्पमध्ये चोरीचा प्रयत्न; सतर्क जवानांमुळे दोन चोरटे मुद्देमालासह जेरबंद

Theft at Powai, NSG Camp, NSG Jawans, Thieves

प्रातिनिधिक छायाचित्र

पवई येथील नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) कॅम्पमध्ये चोरी करण्याचा दोन चोरट्यांचा प्रयत्न सतर्क सुरक्षा जवानांमुळे अपयशी ठरला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शमीम सलीम शेख (वय ३३) आणि सूरज गजानन यादव (वय १८) या दोन इसमांना रंगेहात पकडून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जून २०२६ रोजी रात्री ११.०० वाजण्याच्या सुमारास एनएसजी कॅम्पमधील असिस्टंट कमांडर ब्रिजराज सिंग हे त्यांचे सहकारी रेंजर सातपुते यांच्यासोबत कॅम्प परिसरामध्ये पेट्रोलिंग (गस्त) घालत होते. पेट्रोलिंग करत असताना ते ऑफिसर्स मेससमोरील नवीन ऑफिसर्स हाऊसच्या बांधकाम सुरू असलेल्या परिसरात पोहोचले. अंधारामध्ये दोन संशयास्पद व्यक्तींची हालचाल त्यांना दिसून आली.

सिंग आणि सातपुते त्या दिशेने जात असताना, दोन्ही चोरट्यांनी बांधकामाचे लोखंडी रॉडचे बंडल खांद्यावर घेऊन कंपाऊंडच्या भिंतीला लावलेल्या शिडीवरून दुसऱ्या बाजूला फेकले. जवान आपल्या दिशेने येत असल्याचे पाहताच त्यांनी भिंतीवरून उड्या मारून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र असिस्टंट कमांडर सिंग यांनी तातडीने ‘क्यूआआरटी’ (QRT) टीमला चॅनेलवरून कॉल करून घटनेची माहिती दिली.

ड्युटीवर असलेले असिस्टंट कमांडर रणजीत कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत कंपाऊंडच्या बाहेरील भागात दोन्ही चोरट्यांना मुद्देमालासह पकडून ठेवले. पवई पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले.

“आरोपींकडून ४ फूट लांबीचे लोखंडी रॉडचे ५ बंडल (वजन १०० किलो, अंदाजे किंमत ५००० रुपये) आणि १० फूट लांबीचा लोखंडी चॅनेल (वजन २० किलो, किंमत अंदाजे १००० रुपये) असा एकूण ६००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे,” असे पवई पोलिसांनी सांगितले.

पवई पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरु आहे.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!