पवईत पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला; ३ आरोपींना बिहारमधून अटक

पवई येथील फिल्टर पाडा परिसरात गप्पा मारत उभे असलेल्या एका तरुणावर आणि त्याच्या नातेवाईकावर पूर्ववैमनस्यातून चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने (डिटेक्शन टीम) अत्यंत कौशल्याने तांत्रिक तपास करत थेट बिहार राज्यातून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

नेमकी घटना काय?

तक्रारदार रशीदा खान यांनी दिलेल्या जवाबानुसार, १५ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी त्यांच्या मुलीचा परिसरातील शरियार शफिक खान उर्फ ‘छोटू’ नावाच्या इसमासोबत वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आला.

१६ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री तक्रारदार यांचा नातवाचा वाढदिवस साजरा झाल्यानंतर तक्रारदार, त्यांचा मुलगा सलमान (वय ३८), आणि नातेवाईक यासर अस्लम खान हे घराखाली गप्पा मारत उभे होते. रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास दोन मोटरसायकलवरून चार अज्ञात इसम तिथे आले. त्यांनी सलमान आणि यासर यांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली.

चाकूने सपासप वार

“मारहाणी दरम्यान सलमान खाली पडला असता, हेल्मेट आणि मास्क घातलेल्या एका आरोपीने “इसको आज मैं मार डालूंगा, आज ये मेरे हाथ से बचेगा नहीं,” असे ओरडत सलमानच्या पाठीत आणि डोक्यात चाकूने गंभीर वार केले. सलमानला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या यासरवरही चाकूने वार करण्यात आला, ज्यामध्ये तो किरकोळ जखमी झाला. तक्रारदार आणि यासर यांनी आरडाओरडा केल्यावर चारही आरोपी दुचाकीवरून पळून गेले. सलमानच्या पाठीतील घाव थेट फुफ्फुसापर्यंत गेल्याने त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला लोकमान्य टिळक (सायन) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले,” असे पवई पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्याने सांगितले.

पवई पोलिसांची बिहारमध्ये धडक कारवाई

घटनेचे गांभीर्य ओळखून पवई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ११५, ११८ (१), ३५२, ३५१ (३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनानुसार, गुन्हे प्रगटीकरण अधिकारी सपोनी संतोष कांबळे आणि पोलीस उपनिरीक्षक गणेश आव्हाड यांनी तांत्रिक तपास करून धारावीतील चार आरोपींची ओळख पटवली.

आरोपी मुंबईतून परराज्यात पळून गेल्याची माहिती मिळताच उपनिरीक्षक गणेश आव्हाड, उपनिरीक्षक रामचंद्र पिंजरकर, पोलीस हवालदार सुरनर, चव्हाण आणि पोलीस शिपाई अर्जुन राठोड यांच्या पथकाने थेट बिहार गाठले. “तांत्रिक तपास आणि खबऱ्याच्या मदतीने तेथील विविध जिल्ह्यांतून ३ आरोपींना यशस्वीरित्या ताब्यात घेतले आहे” असे पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांनी सांगितले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे: १. शेख मोहम्मद अमीर मोहम्मद मकसूद (वय २६, रा. धारावी, मुंबई) २. अब्दुल अजीज कादिर शेख (वय २२, रा. धारावी, मुंबई) ३. विधी संघर्षग्रस्त बालक (वय १६)अल्पवयीन बालकाला कायदेशीर नोटीस देऊन बिहारमधील दरभंगा येथील त्याच्या भावाच्या ताब्यात देण्यात आले असून, पवई पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

अटक करण्यात आलेल्या दोन्ही सज्ञान आरोपींना ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणले जात असून, पवई पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!