‘शासन तुमच्या दारी’ संकल्पने अंतर्गत हिरानंदानी भागात रविवार, ३ मार्चला जन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग); महेश्वर रेड्डी, पोलीस उपायुक्त (परिमंडळ १०); रमेश नांगरे, सहाय्यक आयुक्त (साकीनाका विभाग); आबुराव सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (पवई पोलीस ठाणे); पोलीस निरीक्षक दिलीप धामुनसे (गुन्हे); आमदार दिलीप (मामा) लांडे, हिरानंदानी समूहाचे सुदिप्ता लाहिरी, रोटरी क्लबचे हनुमान त्रिपाठी, रोटरी क्लब ऑफ मुंबई लेकर्सचे दिपक दर्यानानी, संजय तिवारी आणि जन प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी हिरानंदानी परिसरातील विविध समस्यांवर उपाय सुचवण्यासोबतच स्वतंत्र बिट चौकी, पोलीस मित्र आणि अवैद्य डंपर वाहतूक बाबत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
संपूर्ण मुंबईची समस्या असणाऱ्या कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी, वाहतूक कोंडी अशा काही समस्यांपासून मुंबईच्या शिरपेचातील एक तुरा मानला जाणारा पवई परिसरही सुटलेला नाही. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या अशा आणि इतर समस्या जाणून घेण्यासाठी आमदार दिलीप लांडे यांच्यावतीने रविवारी हिरानंदानी परिसरातील सुप्रीम बिसनेस पार्क येथील अथेना बँक्वेट हॉल येथे ‘शासन तुमच्या दारी’ संकल्पने अंतर्गत जन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मुंबई पोलीस दलातील अतिरिक्त पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (परिमंडळ १०) महेश्वर रेड्डी, सहाय्यक आयुक्त (साकीनाका विभाग) रमेश नांगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे, पोलीस निरीक्षक दिलीप धामुनसे (गुन्हे) शासनाच्यावतीने आमदार दिलीप लांडे उपस्थित होते.
रॅश ड्राईविंग, नशेखोरांचा उच्छाद
यावेळी उपस्थित नागरिकांनी आणि जनप्रतिनिधी यांनी वाहतूक कोंडी, पवई तलाव स्वच्छता, रॅश ड्राईविंग, नशेखोर, नागरिकांनी वाहतुकीचे नियम न पाळणे, नागरिकांच्या सुरक्षेचे प्रश्न, परिसरात बाहेरून येणाऱ्या लोकांकडून घालण्यात येणारा उच्छाद, शालेय वाहने रस्त्यांवर पार्क केल्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि इतर समस्या अशा एक ना अनेक समस्या यावेळी मांडण्यात आल्या.
या समस्येंवर बोलताना पोलीस प्रशासनाच्यावतीने विकासक आणि लोकप्रतिनिधीना पुरेशा स्ट्रीट लाईटची व्यवस्था करणे. गुन्हे नियंत्रणासाठी सोसायटीच्या आत सोबतच बाहेरील हालचाली सुद्धा रेकॉर्ड होतील अशा पद्दतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे. काही ठिकाणे ठराविक कालावधीत जनतेसाठी प्रतिबंधित घोषित केल्यास पोलिस कारवाई करू शकतील. पोलीस प्रशासन कडक कारवाई करत आहे इथून पुढील काळात आणखी मोठ्या प्रमाणात कारवाई करत नागरिकांच्या कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी रोखणे, नशेखोरी रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जातील असे पोलीस प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
मोठे ठोस निर्णय
परिसरातील गैरप्रकार आणि समस्या रोखण्यासाठी स्वतंत्र बीट चौकीचे निर्माण करणे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने ‘पोलीस मित्र’ ही संकल्पना राबवत पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने परिसरात गस्त घालणे. परिसरात ओल्ड मार्केट, हेरीटेज उद्यान भागासह महत्वाच्या ठिकाणांवर पोलीस – नागरिक बंदोबस्त ठेवणे. तसेच परिसरातील वाहतुकीच्या मोठ्या समस्येवर तोडगा काढत परिसरातील डंपर आणि अवजड वाहनांना प्रवेश बंदी करणे. नियम न पाळणाऱ्या, रॅश ड्राईवर कडक कारवाई करत, वाहने जप्त करणे. असे निर्णय घेण्यात आले असून, त्यांच्या अंमलबजावणीसाठी अधिकृत पूर्तता करण्यात येणार आहे.
नवीन रस्त्यांच्या आणि सुविधांच्या निर्मितीसह शासन दरबारी करावयाचे पाठपुरावे करून परिसरात जास्तीत जास्त आणि आवश्यक सुविधा देण्याचे काम. पवई तलावाचा मुद्दा पर्यावरण मंत्री आणि पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडण्यात आला असून, लवकरच ते पाहणी करणार असल्याचे यावेळी बोलताना आमदार लांडे यांच्याकडून सांगण्यात आले.
नागरिकांनीही यावेळी प्रशासकीय निर्णयाची प्रशंसा करत आणि विश्वास दर्शवत येणाऱ्या काळात नागरिकांच्या या समस्यांचे निवारण होण्याची आशा यावेळी दर्शवली.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.