शिवसेनेचे स्थानिक (चांदिवली विधानसभा) आमदार दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली वाढीव वीजबिल विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या चेंबूर येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढत हे निषेध आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत त्यांचे अधिकारी प्रत्यक्षात जाऊन त्या विभागातील जनतेच्या शंका, समस्या दूर करत नाहीत तोपर्यंत कोणतेही वीज कनेक्शन कापण्यात येणार नाही. तसेच जनतेच्या शंका दूर झाल्यानंतरच वीजबिल भरण्यात येईल अशा सूचना लांडे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबतच मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात अनेक मुंबईकरांना अव्वाच्या सव्वा वीजबिल आले आहेत. आधीच आर्थिक स्थिती खालावलेली असताना सामान्य नागरिकांनी ही बिले कशी भरायची अशी तक्रार सर्वच भागातून नागरिक करत आहेत. या काळात काहींनी वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून नाईलाजास्तव वीजबिल भरणा केला आहे. मात्र अजूनही बरेच असे नागरिक आहेत ज्यांना हे वीजबिल भरणे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली आहे. याला पाहता चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप मामा लांडे पुढे सरसावले आहेत. लांडे यांच्या नेतृत्वाखाली आज, (गुरुवार १३ ऑगस्ट) रोजी वाढीव वीज बिलाच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या चेंबूर येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढत हे निषेध आंदोलन करण्यात आले.
“संबंधित खात्याचे मंत्री नितीन राऊत यांनी बैठक घेवून अदानी इलेक्ट्रिसिटीच्या अधिकाऱ्यांना ज्या विभागातून तक्रारी असतील त्या त्या विभागात जावून त्यांचे निवारण करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र ते ‘अडाणी’ सारखे वागत असल्याने आम्ही त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी येथे आलो आहोत. मंत्री आणि परब साहेब यांनी याबाबत सूचना केल्या आहेत याची आठवण आम्ही त्यांना करून दिलेली आहे”, असे याबाबत बोलताना आमदार लांडे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले “त्यांचे अधिकारी प्रत्यक्षात जाऊन त्या विभागातील जनतेच्या शंका, समस्या दूर करत नाहीत तोपर्यंत कोणतेही वीज कनेक्शन कापण्यात येणार नाही. तसेच जनतेच्या शंका दूर झाल्यानंतरच वीजबिल भरण्यात येईल अशा सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.”
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा.
No comments yet.