पालिकेतर्फे स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई अंतर्गत मुंबईत सार्वजनिक ठिकाणी घाण पसरवणाऱ्या आणि थुंकणाऱ्या लोकांवर कारवाई करत दंड ठोठावले जातात. मात्र पालिकेच्या दरवाजातच असे कृत्य घडत असेल तर त्याचे काय? पालिका एस विभागात आपल्या कामानिमित्त येणाऱ्या लोकांसोबत असे प्रकार वारंवार घडत असल्याने सामाजिक कार्यकर्ते मुक्ताराम कांबळे यांनी या कार्यालयातील खिडक्यांना जाळ्या बसवण्याची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी पालिका एस विभाग सहाय्यक आयुक्त यांना लेखी तक्रार करत जाळ्या बसवण्याची मागणी केली आहे.
मुंबईतील रस्ते, परिसर, सरकारी आणि खाजगी कार्यालयाच्या भिंती म्हणजे पान, गुटखा, तंबाकू खाऊन रंगवण्याची जागा असा जणू नियमच झाला आहे. याला रोखण्यासाठी पालिकेने असे कृत्य करणाऱ्या लोकांवर दंड ठोठावणे सुरु केले आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे अनेक संसर्गजन्य व प्राणघातक आजारांचा फैलाव होतो. करोनाच्या साथीमध्ये थुंकीच्या माध्यमातून संसर्ग आणखी वाढण्याची भीती आहे. याबाबत दक्षता घेऊन जनतेच्या हितासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी करोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा अशा पदार्थांचे सेवन करून थुंकणे किंवा धूम्रपान केल्यास पाच हजार रुपये दंड आणि पाच दिवसांपर्यंत सार्वजनिक सेवा करण्याची शिक्षा होणार आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी साथरोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींनुसार राज्यात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा; तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकण्यास व धूम्रपानास प्रतिबंध करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. हे आदेश राज्यात सर्वत्र लागू राहतील, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले होते. मात्र हा नियम पालिका एस विभागाच्या कार्यालयात पूर्णपणे धाब्यावर बसवला जात असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.
इमारतीच्या खिडकीला जाळ्या बसवण्यात याव्यात
“मंगळवारी, २९ सप्टेंबरला मी कामानिमित्त टपाल कार्यालयाकडे जात असताना, पालिका एस विभागाच्या इमारतीच्या खिडकीतून कोणीतरी अधिकारी, कर्मचारी किंवा नागरिक थुंकला जे सरळ माझ्या अंगावर आणि कपड्यावर येवून पडले. सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना दंड ठोठावणाऱ्या पालिका कार्यालयातच त्या नियमाचा भंग केला जात आहे. यासाठी मी संबंधित दोषी अधिकारी, कर्मचारी किंवा नागरिक याच्यावर कारवाई करण्यात यावी. जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून संबंधित इमारतीच्या खिडकीला जाळ्या बसवण्यात याव्यात अशी मागणी केली आहे.” असे याबाबत बोलताना कांबळे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “आज हा प्रकार नागरिकांसोबत घडत आहे. उद्या हा प्रकार पालिका अधिकारी, कर्मचारी आणि कदाचित पालिका सहाय्यक आयुक्त यांच्यासोबत सुद्धा घडू शकते. त्यामुळे पालिकेने योग्य वेळी पाऊले उचलणे आवश्यक आहे.”
No comments yet.