मुंबईतील विविध भागात रिक्षा चोरी करणाऱ्या टोळीच्या ४ सदस्यांना आरे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी चोरट्यांना अटक केली आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या रिक्षा चोरून संबंधित रिक्षाची नंबर प्लेट बदलून काही रिक्षा चालकांना तीनशे रुपये प्रमाणे भाड्याने चालवायला देत तर काही रिक्षा नाममात्र किंमतीला विकत. पोलिसांनी नालासोपारा, अंधेरी, गोरेगाव परिसरातून ६ रिक्षा जप्त केल्या आहेत.
समद शब्बीर शेख (२४), सुफियान इम्रान खान (२५), रफिक रहमान खान (३०), आमिर शरीफ भट (२४) अशी अटक करण्यात आलेल्या रिक्षा चोरांची नावं आहेत. संबंधित सर्व आरोपी पवई येथील रहिवासी असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक रिक्षा चोरी झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करताना आरे पोलिसांनी पवईसह आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांना हे आरोपी ठाणे, पवई आणि मुंबईतील विविध भागात असल्याची माहिती प्राप्त झाली होती. माहितीच्या आधारावर पोलिसांनी त्यांना विविध परिसरातून ताब्यात घेवून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
चोरीच्या ऑटो रिक्षाची नंबर प्लेट बदलून केवळ ५ हजारांना ते विकत असत तसेच चोरी केलेल्या ऑटो रिक्षाला भाड्याने देवून प्रत्येकी ३०० रुपये भाडे आकारात असल्याची सुद्धा त्यांनी कबुली दिल्याची पोलिसांनी सांगितले.
अटक आरोपींमधील सुफियान हा सराईत गुन्हेगार असून तो चेन स्नॅचिंगचा मास्टर माइंड आहे. त्याच्यावर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. या घटनेचा पुढील तपास आरे पोलीस करत आहेत.
No comments yet.