
डावीकडे – १८ डिसेंबरला फोडण्यात आलेली कार, उजवीकडे – चोरीसाठी मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांचा सीसीटीव्ही ग्रॅब
मुंबईतील सर्वात सुरक्षित आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पवईतील हिरानंदानी परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी, १८ डिसेंबर रोजी एकामागून एक तब्बल ६ कारच्या काचा फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे मौल्यवान सामान चोरले. धक्कादायक बाब म्हणजे, ही सर्व लुटालूट केवळ ३० मिनिटांच्या कालावधीत करण्यात आली. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
गुरुवारचा दिवस असल्याने हिरानंदानी परिसरात खरेदी आणि कामासाठी मोठी गर्दी होती. संध्याकाळच्या सुमारास धूसर अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी आपला डाव साधला. सेंट्रल एव्हेन्यू रोड, व्हेंचुरा बिल्डिंग, हिरानंदानी हॉस्पिटल यांसारख्या गजबजलेल्या भागात पार्क केलेल्या गाड्यांना चोरट्यांनी लक्ष्य केले. लोक आपली कामे आटोपून परतले तेव्हा त्यांना आपल्या कारच्या काचा फुटलेल्या दिसल्या आणि आतील मौल्यवान वस्तू गायब झाल्याचे लक्षात आले.
कोणाचे काय चोरीला गेले?
या चोरीच्या सत्रात अनेक जण भरडले गेले आहेत. कांजूरमार्गचे रहिवासी, तक्रारदार पिट्टा रामुनायडू हे घर पाहण्यासाठी हिरानंदानीत आले होते. व्हेंचुरा इमारतीबाहेर गाडी उभी करून ते केवळ कोल्ड्रिंक घेण्यासाठी बाजूला असलेल्या दुकानात गेले, तितक्यात चोरट्यांनी त्यांच्या गाडीची डाव्या बाजूची काच फोडून लॅपटॉप असलेली बॅग पळवली.
दुसरीकडे, ‘चायोज’ जवळ पार्क केलेल्या तक्रारदार तोटापल्ली रविकांत यांच्या गाडीतून लॅपटॉप चोरीला गेला, तर विस्मया कोचमपल्ली या १९ वर्षीय विद्यार्थिनीने ‘हिचकी’ हॉटेलबाहेर आपली एमजी हेक्टर गाडी उभी केली होती. चोरट्यांनी तिच्या गाडीची काच फोडून लॅपटॉप आणि महत्त्वाची कागदपत्रे पळवली.
इतकेच नाही, तर एका तरुणीच्या आईने स्थानिक व्हॉट्सॲप ग्रुपवर दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल मेलुहा, हायको सुपरमार्केटजवळ तिच्या मुलीने पार्क केलेल्या गाडीतून मुलीच्या मैत्रिणीचे लॅपटॉप, महागडे एअरपॉड्स, ब्रँडेड कोच बॅग, रोख रक्कम आणि क्रेडिट कार्ड्स चोरीला गेले आहेत. याव्यतिरिक्त ऑलिम्पिया इमारतीजवळ एक आणि हॉस्पिटलजवळ दोन गाड्या फोडल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांचा तपास आणि सीसीटीव्ही फुटेज
पवई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) आणि ३२४ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयित तरुण मोटारसायकलवरून येताना दिसले आहेत. हे दोघेही अत्यंत सराईतपणे गाड्यांच्या काचा फोडून काही क्षणात पसार होत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे,” असे पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
वाचकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना:
१. वर्दळीच्या ठिकाणी गाडी पार्क केली तरी मौल्यवान वस्तू (लॅपटॉप, बॅग) सीटवर उघड्यावर ठेवू नका.
२. शक्यतो गाडी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या थेट नजरेत असेल अशा ठिकाणी पार्क करा.
३. गाडीतून उतरताना सर्व दरवाजे आणि खिडक्या नीट लावल्या आहेत की नाही, याची खात्री करा.
पवई पोलीस या प्रकरणाचा वेगाने तपास करत असून, नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.



No comments yet.