चांदिवलीकरांचे पालिकेच्या चालढकलपणा विरोधात अनोखे आंदोलन; ‘झूट बोलो’ केक कापून नोंदवणार निषेध

पालिकेच्या ढिसाळ आणि चालढकल कामाच्या निषेधार्थ चांदिवली सिटीझन वेल्फेअर संघटनेच्या (सीसीडब्ल्यूए) नेतृत्वात आज, रविवार, १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:०० वाजता चांदिवलीकरांनी एक अनोख्या निषेध कार्यक्रमाचे आयोजन केले आले आहे. रहिवाशांतर्फे ‘झूट बोलो’ पोकळ आश्वासनांचा केक कापून हा निषेध नोंदवण्यात येणार आहे. चांदिवली सिंक्रोनिसिटी क्लब हाऊस, येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) ते चांदिवली फार्म रोडला जोडणारा ९० फूट रस्ता रखडल्याच्या  निषेधार्थ आणि तो लवकरात लवकर बनवण्यात यावा यासाठी दोन वर्षांपूर्वी सीसीडब्ल्यूएने उपोषण केले होते. याच्या उत्तरादाखल पालिकेने एक प्रेस विज्ञप्ती प्रसिद्ध केली होती. ज्यामध्ये जेव्हीएलआर ते चांदिवली फार्म रोडला जोडणाऱ्या ९० फूट रस्त्याचे काम लवकरच सुरु करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

या सार्वजनिक वचनबद्धतेनंतरही, ३२ वर्षांपूर्वी नियोजित या प्रकल्पात कोणतीही प्रगती झालेली नाही. याबाबत पालिकेकडे सतत पाठपुरावा करून देखील पालिका काहीच पाऊले उचलत नसल्याने रहिवाशांनी होणाऱ्या त्रासाच्या विरोधात निषेधाचे अनोखे पाउल उचलले आहे.

पालिकेची निष्क्रियता आणि वचनभंग अधोरेखित करण्यासाठी सीसीडब्ल्यूएतर्फे ‘झूट बोलो’ (खोटे बोलणे) केक कापून निषेधाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. चांदिवलीतील रहिवाशांसाठी महत्त्वाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याबद्दल हा कार्यक्रम प्रतिकात्मक निषेध म्हणून आयोजित केला आहे.

असोसिएशनचे संस्थापक मनदीप सिंग मक्कर म्हणाले की, “नागरिकांकडे अनोख्या पद्धतीने निषेध करण्याशिवाय पर्याय नव्हता. आम्हाला आशा आहे की किमान आता तरी पालिका प्रशासन जागे होईल आणि आपले वचन पूर्ण करेल. हा प्रकल्प ३२ वर्षांपूर्वी कल्पित होता.

ते पुढे म्हणाले “नियोजित सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित केल्या जात नसताना ते परिसरात नवीन गृहनिर्माण संकुलांना परवानगी कशाच्या आधारावर देत आहेत? अपुऱ्या प्रवेशासह नवीन इमारती आणि हजारो नवीन फ्लॅट बांधले जात आहेत. पालिकेने आधी नियोजित पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात हिच आमची मागणी आहे.”

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!