गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान विजेचा झटका लागून एकाचा मृत्यू, पाच जखमी

गणेश चतुर्थीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान चांदिवली, खैरानी रोड भागात विजेचा झटका लागून, एकाचा मृत्यू झाला आहे, तर ६ वर्षाच्या मुलासोबत पाच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यासंदर्भात साकीनाका पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास करत आहेत, असे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.

साकीनाका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री १०.४५ वाजता चांदिवली परिसरातील खैरानी रोडवर ही घटना घडली. मंडळाची गणपती मिरवणूक खैराणी रोडवरील सन्मान हॉटेलजवळ आली असताना ही घटना घडली. या घटनेत मूर्ती घेवून जाणाऱ्या ट्रॉलीच्या वरच्या भागाला विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने याच्या जवळ उभ्या सहा भाविकांना विजेचा धक्का बसला.

“एका व्यक्तीला मरोळ येथील सेव्हनहिल्स रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. इतर पाच जखमींना साकीनाका येथील पॅरामाउंट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मृत व्यक्तीची ओळख बिनू सुकुमारन (३७) अशी झाली आहे.

शुभांशू कामत (२०), तुषार गुप्ता (२०), धर्मराज गुप्ता (४९), करण कनोजिया (१४) आणि आरुष गुप्ता (६) या पाच जखमींना पॅरामाउंट रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!