पवई परिसरात राहणाऱ्या एका ३१ वर्षीय महिला डॉक्टरवर एका मद्यधुंद व्यक्तीने हल्ला केल्याची आणि तिच्या आलिशान ऑडी कारचीही तोडफोड केल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे घडली. पिडीत महिला डॉक्टर वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एशियन हार्ट हॉस्पिटलमधील आपल्या ड्युटीवरून घरी परतली तेव्हा ही घटना घडली.
पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार डॉक्टर सकाळी ५ वाजता आपली ड्युटी संपवून पवई, फिल्टरपाडा येथे आपल्या राहत्या घराजवळ परतली. आपली ऑडी कार एका मेडिकल स्टोअरजवळ पार्क करून घराकडे चालत गेली.
“अचानक, येथील स्थानिक रहिवासी अब्दुल्लाह झुबेर खान तिच्या समोर आला. तो दारूच्या नशेत होता. खानकडे १.५ फूट लांब चाकू आणि तीन फूट लांबीचा लोखंडी रॉड होता. अचानक त्याने महिलेवर हल्ला केला. प्रसंगावधान राखत तिने आरडाओरड करत तेथून पळ काढला,” असे पोलिसांनी सांगितले.
माझी आई आणि भाऊ यांना घडला प्रसंग सांगितल्यानंतर आम्ही तिघे माझी गाडी पार्क केलेल्या ठिकाणी आलो असता खान माझ्या गाडीची थोड्फोड करत होता. आम्ही आरडाओरड करताच त्याने आपल्या हातातील चाकू हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण करून निघून गेला, असे पोलिसांना दिलेल्या जवाबात महिला डॉक्टरने म्हटले आहे.
यासंदर्भात महिला डॉक्टरांनी १०० नंबरवर फोन करताच त्वरित पवई पोलिसांची मोबाईल ५ गाडी घटनास्थळी पोहचली आणि घटनेची माहिती घेतली. कारची पाठीमागील काच आणि ड्रायव्हर बाजूची पाठीमागील खिडकीची काच फोडल्याचे आढळून आले.
महिला डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पवई पोलिसांनी आरोपी अब्दुल्लाह झुबेर खान याच्या विरोधात शस्त्र अधिनियम कलम २५, ४; महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३१५, ३७(१) सह भारतीय न्याय संहिता कलम ३२४ (५) नुसार गुन्हा नोंद केला आहे.



No comments yet.