पवईतील हॉटेलमध्ये चित्रपट दिग्दर्शकाच्या बॅगेवर डल्ला; ५.३० लाखांची रोकड आणि चांदी लंपास

पवई येथील हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या एका तरुण चित्रपट दिग्दर्शकाच्या बॅगेतून लाखो रुपयांची रोकड आणि चांदीच्या विटा चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हॉटेलमध्येच राहणाऱ्या एका व्यक्तीवर संशय व्यक्त करण्यात आला असून, पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार रिश्भा गिरी (वय २८) या व्यवसायाने चित्रपट दिग्दर्शक असून, कामा च्या निमित्ताने त्या मागील काही महिन्यांपासून साकीविहार रोडवरील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होत्या. त्यांनी आपल्या मेहनतीच्या कमाईतून गुंतवणुकीसाठी २ किलो वजनाच्या चांदीच्या दोन विटा खरेदी केल्या होत्या. या विटा आणि १ लाख ३० हजार रुपयांची रोकड त्यांनी हॉटेलमधील आपल्या रूममध्ये एका बॅगेत ठेवली होती.

१० मार्च २०२६ रोजी पैशांची गरज भासल्याने त्यांनी बॅग तपासली असता, त्यात रोकड आणि चांदीच्या विटा नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने ही बाब हॉटेल व्यवस्थापनाच्या कानावर घातली.

गिरी यांनी हॉटेलचे मॅनेजर आणि स्वतःचे वैयक्तिक मॅनेजर यांच्या उपस्थितीत हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता धक्कादायक वास्तव समोर आले. याच हॉटेलमध्ये राहणारा सदानंद चौबे (वय २५) हा २८ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत चोरून रूममध्ये शिरून बॅगेतून मुद्देमाल काढताना दिसून आला. “जेव्हा सर्व सीसीटीव्ही तपासत होते, तेव्हा सदानंदने त्यांना दुरून पाहिले आणि पकडले जाण्याच्या भीतीने तो तातडीने हॉटेलमधून पसार झाला,” असे पवई पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “सदानंदने आपला मोबाईल फोन बंद केला असून, तो त्याच्या मूळ गावी पळून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चोरीत एकूण ५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल (१.३० लाख रोकड आणि ४ लाख किमतीची चांदी) चोरीला गेला आहे.” हॉटेलमधील सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पवई पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) नुसार सदानंद चौबे विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!