आयआयटी पवई हॉस्टेलमधून जिवंत काडतुसे जप्त, एकाला अटक

संग्रहित छायाचित्र

मुंबई: आयआयटी बॉम्बे, (IIT-B) पवई सारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेच्या परिसरात जिवंत काडतुसे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हॉस्टेलमधील दोन विद्यार्थ्यांमधील किरकोळ वादाची चौकशी करत असताना सुरक्षा रक्षकांना पाच जिवंत काडतुसे (Live Rounds) आढळून आली. याप्रकरणी पवई पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

नेमकी घटना काय?

पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ फेब्रुवारी २०२६ च्या रात्री पवई आयआयटीमध्ये सुरक्षा उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले अमोद करंजे हे आपल्या रात्रीच्या कर्तव्यावर हजर होते. १९ फेब्रुवारीच्या पहाटे दीडच्या सुमारास त्यांना माहिती मिळाली की, हॉस्टेल क्रमांक १ मध्ये काही विद्यार्थ्यांमध्ये जोरदार वाद सुरू आहे. ही माहिती मिळताच करंजे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी तिथे विद्यार्थ्यांची मोठी गर्दी जमली होती. प्राथमिक चौकशीत असे समोर आले की दोन विद्यार्थी यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला होता.

तपासणीत धक्कादायक खुलासा

“सुरक्षा रक्षकांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता, येथे बी-टेकच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांच्या तोंडाला मद्याचा वास येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हॉस्टेलमध्ये मद्यपानास बंदी असल्याने आणि विद्यार्थ्यांचे वर्तन संशयास्पद वाटल्याने सुरक्षा पथकाने त्यांच्या रूमची झडती घेण्याचे ठरवले. पहिल्या विद्यार्थ्याच्या रूमची तपासणी करत असताना, पलंगावर असणाऱ्या एका काळ्या सॅक बॅगमध्ये पुढील कप्यात पाच जिवंत काडतुसे (ज्याच्यावर KF 7.65 असे नमूद आहे) सुरक्षा पथकाला सापडली,” असे पवई पोलिसांनी सांगितले.

काडतुसे आली कुठून?

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “या जिवंत काडतुसांबाबत सुरक्षा पथकाने विद्यार्थ्याकडे विचारणा केली असता, त्याने सांगितले की ही सॅक बॅग त्याच्या दुसऱ्या विद्यार्थी मित्राची आहे. जेव्हा दुसऱ्या विद्यार्थ्याकडे याबाबत चौकशी करण्यात आली, तेव्हा त्याने धक्कादायक खुलासा केला. त्याने सांगितले की, त्याचा बिहारमधील मित्र सर्वोत्तम आनंद सतीशचंद्र चौधरी हा १२ फेब्रुवारी रोजी गावावरून त्याला भेटण्यासाठी मुंबईत आला होता. सर्वोत्तमनेच ही पाच जिवंत काडतुसे त्याच्या सोबत आणली होती आणि त्याच्या सॅक बॅगमध्ये लपवून ठेवली होती.”

१९ फेब्रुवारीला सर्वोत्तम पुन्हा मित्राला भेटण्यासाठी आयआयटी येथे आला असताना त्याला आयआयटी सुरक्षा पथकाने ताब्यात घेतले. कोणत्याही परवान्याशिवाय अशा प्रकारे घातक दारूगोळा बाळगणे हा गंभीर गुन्हा असल्याने, आयआयटी प्रशासनाने तातडीने त्याला पवई पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिस कारवाई

सुरक्षा उपनिरीक्षक करंजे यांच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी सर्वोत्तम आनंद सतीशचंद्र चौधरी याच्या विरोधात भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

“आरोपी सर्वोत्तम याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, ही काडतुसे बिहारमधील मुंगेर येथून अवघ्या ३५०० रुपयांना विकत घेतल्याची त्याने कबुली दिली आहे. त्याने ही काडतुसे मुंबईत कोणत्या उद्देशाने आणली होती, याचा तपास आता पोलीस करत आहेत,” असे पवई पोलिसांनी सांगितले.

आयआयटी-बॉम्बेने जारी केले निवेदन

यासंदर्भात आयआयटी-बॉम्बेने जारी केलेल्या निवेदनानुसार, वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीने या गोळ्या कॅम्पसमध्ये आणल्या होत्या. दोघेही बालपणीचे मित्र आहेत. वसतिगृहात दोन विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक हाणामारी झाली तेव्हा त्याची चौकशी करण्यासाठी गेलेल्या सुरक्षा रक्षकांसमोर हे चित्र आले. त्यापैकी एक विद्यार्थी मद्यधुंद अवस्थेत आढळला.

प्रक्रियेचा एक भाग म्हणून, सुरक्षा रक्षकांनी विद्यार्थ्याच्या खोल्यांची तपासणी केली आणि त्यांना दारूच्या बाटल्या आढळल्या. जेव्हा त्यांनी खोलीची अधिक तपासणी केली तेव्हा त्यांना खोलीत जिवंत दारूगोळा (गोळ्या) आढळल्या. कृपया लक्षात घ्या की कोणतेही शस्त्र सापडले नाही.

सीएसओ आणि टीमने सविस्तर अंतर्गत चौकशी केली आणि प्रकरण पोलिसांकडे सोपवण्यात आले. एफआयआर दाखल करण्यात आला आहे, अभ्यागताला न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले असून, न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांची पोलिसांनी चौकशी केली आणि त्यांना सोडून देण्यात आले. हे प्रकरण पवई पोलिसांकडे प्रलंबित आहे. प्रक्रियेनुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!