राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाच्या निमित्ताने हॅपी टू हेल्प फाउंडेशनच्यावतीने पवई तलाव भागात ‘क्लीन अप मोहीम’ आयोजित केली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात तरुण, शालेय विद्यार्थी आणि पवईकरांनी यात सहभाग नोंदवला.
आपल्या सर्वांना जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबतच ताजी हवा, हिरवेगार सभोवतालचे वातावरण आणि स्वच्छ पाण्याची गरज आहे. अर्थातच पर्यावरण रक्षण ही सध्या मोठी गरज होवून बसली आहे. मात्र माणसाने स्वतःच्या स्वार्थामध्ये या सर्वांना हानी पोहचवली आहे. याचाच परिणाम सध्या सगळे पाहत आहेत. प्रदूषित वातावरणापासून सर्वांवर हा मोठा फरक जाणवू लागला आहे.
पूर, हवामान बदल, ध्रुवीय बर्फाच्या ढिगाऱ्याचे वितळणे आणि प्रदूषण यासारख्या पर्यावरणीय समस्येचा आपण सामना करीत आहोत. हे प्रदूषण हवा किंवा पाणीपासून असू शकते. मात्र प्रदूषणाच्या मुख्य कारणापैकी एक कारण म्हणजे अयोग्यरित्या टाकलेले किंवा विल्हेवाट लावण्यात आलेला कचरा. म्हणूनच राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाचे औचित्य साधत ‘हॅपी टू हेल्प फाउंडेशन’च्यावतीने पवई तलाव भागात क्लीन अप मोहीम राबवण्यात आली.
“या समस्येला रोखणे कठीण असले तरी कमी करणे नक्कीच शक्य आहे. म्हणूनच आम्ही परिसरात क्लीन अप मोहीम राबवण्याचा विचार केला. ज्यामुळे केवळ आपल्याच समुदायालाच नव्हे तर आपण जगत असलेल्या जगालाही मदत होते. स्वच्छ आणि हिरव्या वातावरणास चालना देण्यासाठी इतर समाजातही ते समान उपक्रम राबविण्यास प्रेरणा देईल.” असे याबाबत बोलताना संस्थेच्यावतीने सांगण्यात आले.
“आमच्या या कार्याला स्थानिक नगरसेविका चंद्रावती मोरे आणि स्थानिक शाखाप्रमुख मनीष नायर यांचे नेहमीच सहकार्य लाभले आहे. आमच्या कार्याला नेहमीच प्रोत्साहन देताना स्वच्छ पवईसाठी ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत,” असेही ते पुढे म्हणाले.
यावेळी मोठ्या प्रमाणत शालेय विद्यार्थी, तरुण आणि पवईकरांनी पवई तलावावर फिरायला येणाऱ्या पर्यटकांनी केलेला कचरा त्याचे वर्गीकरण करून जमा केला. तलावाच्या किनाऱ्याला साफ करत प्रदूषणाच्या विळख्यात अडकत चाललेल्या पवई तलावाला काही काळ का होईना मोकळा श्वास देण्याचे काम केले.
No comments yet.