जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमचा ओटीपी कोणाला शेअर केला नाही म्हणजे तुमचे बँक खाते सुरक्षित आहे, तर सावधान! पवईच्या हिरानंदानी गार्डन्स परिसरातील एका महिलेसोबत झालेली फसवणूक वाचून तुमचे डोके चक्रावेल. सायबर चोरटे केवळ पीडितेच्या बँक खात्यापर्यंतच पोहोचले नाहीत तर बँक रेकॉर्डमध्ये नोंदणी केलेला त्यांचा ई-मेल आयडी देखील बदलला आहे. त्यानंतर इंटरनेट बँकिंगचा वापर करून अतिशय सफाईने ६५ हजार रुपये गायब केले आहेत.
नेमकं काय घडलं?
पवईत राहणाऱ्या एका ४२ वर्षीय महिलेचे नामांकित खाजगी बँकेत खाते आहे. त्या घरी असताना अचानक त्यांच्या मोबाईलवर खात्यातून पैसे वजा झाल्याचा मेसेज आला. त्यांच्या खात्यातून ६५ हजार रुपये काढले गेले होते. कोणताही ओटीपी (OTP) शेअर न करता पैसे गेल्याने त्यांना धक्का बसला. त्यांनी तातडीने बँकेच्या कस्टमर केअरला फोन करून खाते ‘फ्रीज’ केले, ज्यामुळे त्यांचे पुढचे मोठे आर्थिक नुकसान टळले.
बँकेत गेल्यावर उडाली झोप!
खरा धक्का तर पुढे बसला जेव्हा तक्रारदार यांनी बँकेत जाऊन चौकशी केली. “बँक अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या खात्याला जोडलेला त्यांचा जुना ईमेल आयडी बदलून तिथे दुसराच अनोळखी ईमेल नोंदवण्यात आला आहे.” असे पोलिसांनी सांगितले.
ईमेल आयडी बदलण्यासाठी पीडितेने कोणताही अर्ज केला नव्हता, ना त्यांना या बदलासाठी कोणताही ओटीपी आला होता.
तांत्रिक घुसखोरी:
सायबर गुन्हेगारांनी बँकेच्या तांत्रिक यंत्रणेत असणारी त्रुटी किंवा ‘आयडेंटिटी थेफ्ट’च्या मदतीने थेट बँकेच्या डेटाबेसमध्ये प्रवेश मिळवला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
तुम्ही काय काळजी घेऊ शकता?
१. तुमच्या बँक खात्याचे स्टेटमेंट नियमित तपासा.
२. बँकेकडून येणाऱ्या प्रत्येक मेसेजकडे (Alerts) दुर्लक्ष करू नका.
३. संशयास्पद व्यवहार दिसल्यास तातडीने कस्टमर केअरला कळवून खाते ब्लॉक करा.
४. अशा प्रकरणांची तक्रार तात्काळ ‘cybercrime.gov.in’ वर नोंदवा.



No comments yet.