पवईत भरधाव कारने १४ वाहनांना उडवले; २ गंभीर जखमी

पवई येथील टाटा पॉवर हाऊस परिसरात शनिवारी दुपारी एक थरारक आणि भीषण अपघाताची घटना घडली. एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने आपल्या ताब्यातील कार भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत तब्बल १४ वाहनांना जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून, अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पवई पोलीस ठाण्याला नियंत्रण कक्षातून अपघाताची माहिती प्राप्त झाली होती. यावेळी बिट मार्शल ४ वर कार्यरत असणारे पोलीस शिपाई सुमित प्रताप यांनी टाटा पॉवर परिसरात घटनास्थळी धाव घेतली. तिथे एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा बी. इ. ६ कार (एमएच ०२ जीपी ४१७१) हिने जवळपास १४ गाड्यांना जोरदार धडक दिली होती.

“बी इ ६ कारचे चालक उदय लक्ष्मीकांत संघवी (वय ७२) यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या आणि चालत्या वाहनांना एकापाठोपाठ एक धडक दिली होती,” असे पवई पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

या अपघातात साहेबराव यल्लप्पा पवार आणि पंचम सुभेदार मौर्य हे दोन जखमी झाले. “साहेबराव यांच्या डोक्याला आणि खांद्याला गंभीर मार लागला आहे, तर पंचम यांच्या पाठीला आणि पायाला दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने जवळच्या पवई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उदय संघवी हे देखील या घटनेत किरकोळ जखमी झाले होते त्यांना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले,” असे पवई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

या धडकेचा वेग इतका भीषण होता की यात जवळपास १४ वाहनांचे नुकसान झाले आहे. यामध्ये दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी गाड्यांचा समावेश आहे. अपघातानंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला होता. अपघात घडला तेव्हा कार सैरावैरा धावत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

नुकसान झालेल्या वाहनांची यादी: १) एमएच ०९ बीडी ५९१४, २) एमएच ०३ सीटी ६३०५, ३) एमएच ०३ बीएल ७०१६, ४) एमएच ०३ सीएल ६३८०, ५) एमएच ०३ इएक्स ३१५२, ६) एमएच ०४ एमएन ३५१९ ७) एमएच ०३ बीजी ९२०४, ८) एमएच ०१ डीएन ०६८२, ९) एमएच ०२ डीबी १८७१, १०) एमएच ०३ डीएम ७०८४, ११) एमएच ०४ जेएन ६५५८, १२) एमएच ०३ डीएम ८७७७, १३) एमएच ०३ डीइ ६९१९, १४) एमएच ४७ एए ८०१४.

यासंदर्भात पवई पोलिसांनी मोटरवाहन अधिनियम १९८८ कलम १८४ सह भारतीय न्याय संहिता कलम १२५ (अ), २८१, ३२४ (२) नुसार गुन्हा नोंद करून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत निष्काळजीपणे आणि हायगयीने गाडी चालवण्याच्या आरोपाखाली बीइ ६ कार चालक उदय संघवी यांना ताब्यात घेण्यात आले.

“संघवी हे जेष्ठ नागरिक आहेत. गाडी चालवत असताना ब्रेकच्या जागी चुकून एक्सिलेटर दाबला गेल्याने त्यांच्याकडून हा अपघात घडला असल्याचे त्यांनी आपल्या जवाबात म्हटले आहे,” असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!