शेअर बाजारात गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी पवईतील एका सुवर्ण व्यावसायिकाला ३ लाख ७५ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार, ४२ वर्षीय सुवर्ण व्यावसायिक यांचे गलेरिया येथे सोन्याचे दुकान आहे. मार्च २०२५ पासून त्यांना ८४२१२९९२२४ या मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सॲपवर ऑनलाईन ट्रेडिंग संदर्भात सतत संदेश येत होते. सुरुवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केले, मात्र आरोपींनी त्यांना ‘डेमो क्लास’ घेण्याचा आग्रह धरला.
काही दिवसांनी व्यावसायिकाने आरोपीने पाठवलेल्या लिंकवरून ट्रेडिंगचा डेमो पाहिला. त्यानंतर आरोपीने त्यांना वारंवार फोन करून गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त केले. वडिलांची प्रकृती ठीक नसल्याचे सांगत त्यांनी त्यास नकार दिला, मात्र ६ मे २०२५ रोजी आरोपीने ‘तुमचा ट्रेडिंग आयडी एक्सपायर होत आहे’ असे सांगून त्यांना घाईघाईने पैसे भरण्यास भाग पाडले.
“आरोपींनी तक्रारदार यांना ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या एका खात्याची माहिती दिली आणि दोन लिंक पाठवून एक मोबाईल ॲप डाऊनलोड करायला लावले. तक्रारदार यांनी विश्वासाने स्वतःचा आयडी तयार करून सुरुवातीला १,५०,००० रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर त्यांना एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले, जिथे मोबाईल क्रमांक ९९१४३५५२८० या क्रमांकाचा ॲडमिन गुंतवणूक कशी करायची याचे मार्गदर्शन करत होता,” असे पवई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
ते पुढे म्हणाले, “तक्रारदार यांनी टप्प्याटप्प्याने ४ व्यवहाराच्या माध्यमातून त्यांच्या दोन बचत खात्यांमधून एकूण ३,७५,००० रुपये गुंतवले. मी महिन्यात ट्रेडिंग ॲपमध्ये त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर ५,००,८३७ रुपयांचा नफा झाल्याचे दिसत होते. १० मे रोजी जेव्हा त्यांनी नफ्याची रक्कम काढून घेण्याचा (Withdraw) प्रयत्न केला, तेव्हा ती रक्कम निघत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ संबंधित मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींचे दोन्ही नंबर बंद येत होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांक १९३० वर तक्रार नोंदवली.
तक्रारदार यांनी ३१ डिसेंबर रोजी पवई पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी व्हॉट्सॲप चॅटिंग आणि बँक व्यवहारांच्या माहितीवरून तपास सुरू केला आहे.
“अशा प्रकारे अनोळखी लिंकवरून कोणतीही ॲप्स डाऊनलोड करू नका किंवा सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या जाहिरातींना बळी पडू नका,” असे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.



No comments yet.