पवईत ड्रग्ज विक्री करणाऱ्या महिलेला अटक; ८ ग्रॅम एम.डी. जप्त

प्रातिनिधिक छायाचित्र

अमली पदार्थ विक्री विरोधात मुंबई पोलिसांनी हाती घेतलेल्या मोहिमेतंर्गत कारवाई करत पवई पोलिसांनी एका महिला ड्रग्ज विक्रेत्याला बेड्या ठोकल्या आहेत. समरीन फिरोज खान (२८ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव असून, तिच्याकडून ४८ हजार रुपये किमतीचे ८ ग्राम ‘मेफेड्रोन’ (एम.डी.) जप्त करण्यात आले आहे.

२९ डिसेंबरच्या रात्रीपासून पवई पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक गस्तीवर होते. ३० डिसेंबरला सकाळी ७:०० वाजताच्या सुमारास आरे रोडवरील मुरारजी नगर, फिल्टर पाडा भागात गस्त घालत असताना ओरम पार्कजवळ असणाऱ्या नाला परिसरात एका महिलेची हालचाल पोलिसांना संशयास्पद वाटली. पोलीस पथकाला पाहताच तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र मोबाईल ५ वरील महिला पोलीस शिपाई जाधव आणि गुन्हेप्रकटीकरण पथकाने तिला जागीच ताब्यात घेतले.

याबाबत पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असणारे अधिकारी यांना माहिती देवून पंचना पाचारण करून पंचांच्या उपस्थितीत महिलेची अंगझडती घेण्यात आली. “तिच्या गुलाबी जर्सीच्या उजव्या खिशात काळ्या प्लास्टिक पिशवीत पांढऱ्या रंगाची पावडर आढळून आली. तांत्रिक तपासणीत हे ‘मेफेड्रोन’ (MD) असल्याचे स्पष्ट झाले,” असे पवई पोलिसांनी सांगितले.

पथकाने तिची अधिक चौकशी केली असता, “मी एम.डी. चे छोटे पुडे तयार करून नशा करणाऱ्या लोकांना विकते,” अशी कबुली तिने पोलिसांना दिली,” असे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आव्हाड यांनी सांगितले.

यासंदर्भात बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणाले, “या कारवाईत पोलिसांनी एकूण ८ ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले असून, त्याची बाजारपेठेत किंमत सुमारे ४८,००० रुपये आहे. याशिवाय तिच्याकडून विक्रीतून मिळालेली ११०० रुपयांची रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे”

आरोपी महिला समरीन खान ही फिल्टर पाडा परिसरातील रहिवासी आहे. आरोपीविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम ८(क) आणि २२(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिने हे अमली पदार्थ कोणाकडून आणले आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का, याचा तपास पवई पोलीस करत आहेत.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!