मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर चांदिवलीत काल, रविवार २८ डिसेंबरला अजून एक मोठा बदल पाहायला मिळाला आहे. येथील माजी नगरसेवक ईश्वर तायडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. यानंतर चांदिवली येथील वातावरण तापत असतानाच शिवसेनेचे (शिंदे गट) डॉ. सरिता म्हस्के आणि डॉ. रविंद्र म्हस्के यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करत मशाल हाती घेतली आहे.
चांदिवलीतील संघर्षनगर वॉर्ड क्र. १५७ मधील शिवसेना शिंदेगटाच्या डॉ. सरिता म्हस्के आणि डॉ. रविंद्र म्हस्के यांनी मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना सचिव, आमदार मिलिंद नार्वेकर, विभागप्रमुख सोमनाथ सांगळे, आमदार अनिल परब उपस्थित होते.
म्हस्के यांचे आपल्या वार्डात चांगलेच प्रस्थ आहे. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कार्यामुळे या भागात ते अनेक लोकांचे जवळचे मानले जात आहेत. आपल्या वैद्यकीय अनुभवाच्या जोरावर या भागात कोरोना काळात त्यांनी वैद्यकीय सुविधा पुरवत अनेकांना मदतीचा हात दिला होता. कोरोना काळात जवळपास ३ रुग्णालयाने दाखल करण्यास नकार दिलेल्या गर्भवतीची म्हस्के यांनी घरीच प्रसूती करत महिला आणि बाळाला जीवनदान दिले होते. त्यांच्या या कामामुळेच आपला माणूस म्हणून त्यांची या भागात प्रचीती आहे.



No comments yet.