पवई परिसरात एका अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवून भीषण अपघात केल्याची घटना शुक्रवारी (२६ डिसेंबर) रात्री घडली आहे. कार चालक मुलगा हा केवळ १७ वर्षाचा असून, आपल्या काकांची कार घेवून तो मित्रांसोबत फिरायला बाहेर पडला होता. त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यावर रस्त्याच्या कडेला उभी असलेली एक दुचाकीचा चक्काचूर करून, फुटपाथवरील लोखंडी रेलिंगला तोडून, इमारतीच्या गेटला जावून कार धडकली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याप्रकरणी पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (२६ डिसेंबर) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पवई पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पोलीस शिपाई रवींद्र माने गस्तीवर असताना त्यांना नियंत्रण कक्षातून एस एम शेट्टी शाळेजवळ अपघात झाल्याचा संदेश मिळाला. माने तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असता, येथील म्हाडा बिल्डिंग क्रमांक २५च्या गेटसमोर एक टाटा नेक्सॉन कार (एमएच ०२ एफएन १२६२) अपघात घडलेल्या अवस्थेत आढळून आली.
भरधाव वेगामुळे भीषण अपघात
“सदर कार ही अत्यंत वेगात आणि बेदरकारपणे चालवली जात होती. चालकाचा ताबा सुटल्याने कारने प्रथम रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या एका होंडा ॲक्टिवा स्कूटरला (एमएच ०३ ईयू ७४१५) जोराची धडक दिली. त्यानंतर फुटपाथवरील लोखंडी रेलिंगला जोरदार धडक देवून त्याला तोडून कार सरळ इमारतीच्या गेटला जावून धडकली,” असे पवई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आली की, अपघात घडला तेव्हा कार चालवणारा चालक हा अल्पवयीन मुलगा आहे. तो केवळ १७ वर्ष ६ महिन्यांचा आहे. “तो मरोळ येथील रहिवाशी असून, मुलाकडे वाहन चालवण्याचा कोणताही परवाना नाही. कार त्याच्या काकाची असून, घरात कोणालाही न सांगता कार घेवून तो आपल्या मित्रांसोबत हिरानंदानी येथे फिरण्यासाठी आला होता,” असेही पवई पोलिसांनी सांगितले.
अल्पवयीन मुलाला कार चालवण्यास देऊन लोकांचे जीवन धोक्यात घातल्याप्रकरणी, निष्काळजीपणे, बेदरकारपणे, भरधाव गाडी चालवून रस्त्याला उभ्या गाडीला ठोकून नुकसान केल्याप्रकरणी पोलिसांनी कार मालक अफझल खान यांच्याविरुद्ध मोटारवाहन अधिनियम १९८८ कलम १८०, ३ (१), १८१, १८४, १९९ए, सह भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ नुसार कायदेशीर तक्रार नोंदवली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.






No comments yet.