जेव्हा माणुसकी, प्रशासकीय ताळमेळ आणि विज्ञानाची जोड मिळते, तेव्हा मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या व्यक्तीलाही ‘आयुष्याचं दान’ मिळू शकतं. असाच एक थरारक पण तितकाच भावूक प्रसंग २६ डिसेंबर, शुक्रवारी ठाणे आणि मुंबईकरांनी अनुभवला. एका ३८ वर्षीय महिलेने जगाचा निरोप घेताना आपल्या हृदयाच्या रूपाने एका ६० वर्षीय वृद्धाला जीवदान दिले.
मृत्यूवर मात करणारा तो ‘ग्रीन कॉरिडॉर‘
ठाण्यातील महावीर जैन रुग्णालयापासून पवईच्या डॉ. एल. एच. हिरानंदानी रुग्णालयापर्यंतचे अंतर गाठण्यासाठी एरव्ही वाहतुकीमुळे बराच वेळ लागतो. मात्र, एका गंभीर रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी ठाणे आणि मुंबई वाहतूक पोलिसांनी खांद्याला खांदा लावून ‘ग्रीन कॉरिडॉर’ यशस्वी केला. दात्याचे हृदय घेऊन निघालेली रुग्णवाहिका वाऱ्याच्या वेगाने धावली आणि अवघ्या १७ मिनिटांत तिने आपले लक्ष्य गाठले.
एका कुटुंबाचा ‘धाडसी‘ निर्णय
या संपूर्ण मोहिमेच्या केंद्रस्थानी होती एक ३८ वर्षीय महिला. उच्च रक्तदाबामुळे मेंदूत रक्तस्राव झाल्याने तिला ‘ब्रेन डेड’ घोषित करण्यात आले होते. दुःखाच्या या डोंगराखाली दबलेले असतानाही, तिच्या कुटुंबीयांनी सामाजिक भान जपले आणि अवयवदानाचा महान निर्णय घेतला. त्यांच्या या एका निर्णयामुळे हृदयविकाराच्या अंतिम टप्प्यात असलेल्या एका ६० वर्षीय पुरुषाच्या आयुष्याची धडधड पुन्हा सुरू झाली आहे.
या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर डॉ. एल. एच. हिरानंदानी रुग्णालयाचे सीईओ डॉ. समीर कुलकर्णी यांनी अवयवदानाची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले: “२०२४ मध्ये भारतात १८,००० प्रत्यारोपण झाले असले, तरी अजूनही ८०,००० रुग्ण प्रतीक्षेत आहेत. आपल्या देशात अवयवदानाचा दर प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे एकापेक्षाही कमी आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी जनजागृतीची मोठी गरज आहे.”
हा ‘लाईफ सेव्हिंग’ प्रवास शक्य झाला तो झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर (ZTCC), ठाणे व मुंबई वाहतूक पोलीस आणि वैद्यकीय पथकांच्या चोख नियोजनामुळे. दात्याच्या कुटुंबाने दाखवलेल्या धैर्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



No comments yet.