७ डिसेंबर रोजी पवई तलावावरील सायकल ट्रॅक प्रकल्पाचा मुद्दा भाजप खासदार मनोज कोटक यांनी लोकसभेत उपस्थित केला. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे बांधण्यात येत असलेल्या सायकल ट्रॅकमुळे पवई तलावातील जैवविविधतेला धोका असल्याने हा प्रकल्प लवकरात लवकर थांबवावा अशी मागणी कोटक यांनी केली.
पर्यावरण तज्ज्ञांच्या समितीने यापूर्वी सायकल ट्रॅकच्या बांधकामाचे सर्वेक्षण करून हे काम तातडीने थांबविण्याची मागणी केली होती. १२५ वर्षे जुना पवई तलाव उद्ध्वस्त होत असल्याचे मत भाजप खासदार कोटक यांनी यावेळी व्यक्त केले आणि तेथे राहणाऱ्या मगरी आणि सापांच्या विशेष प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याकडे सुद्धा त्यांनी यावेळी लक्ष वेधले.
The construction of a cycle track in the Powai Lake is a serious threat to its biodiversity.
Raised the demand to cease the construction in the Parliament zero hour so that the legacy of the 125 years old heritage Powai Lake is preserved. pic.twitter.com/bzwmug5aRJ
— Manoj Kotak (@manoj_kotak) December 7, 2021
भाजप खासदार मनोज कोटक म्हणाले, पवई तलाव ही मुंबईसाठी हेरिटेज वॉटरबॉडी आहे. या १२५ वर्ष जुन्या तलावाची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. पवई तलावाजवळ बांधण्यात येत असलेल्या सायकल ट्रॅकमुळे तेथील जैवविविधतेला हानी पोहोचेल. तलाव स्वच्छ ठेवण्यासाठी आणि तलावात येणारे सांडपाणी अडवण्याला प्राधान्य दिले पाहिजे. परंतु मुंबई महानगर पालिका सायकल ट्रॅक तयार करण्यात व्यस्त आहे.
पवईच्या लोकांचा आवाज लोकसभेपर्यंत पोहचवण्यासाठी पवईकरांनी कोटक यांचे आभार मानतानाच कोटक यांनी लोकसभेत केलेल्या धाडसी कृतीबद्दल त्यांचे कौतुक केले. पवई तलावातून बनणारा हा प्रकल्प लवकरच स्थगित केला जाईल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला.
सायकल ट्रॅकच्या बांधकामामुळे तलावाचे सौंदर्य नष्ट होत असल्याचा आरोप करत स्थानिकांनी हे काम थांबविण्याची मागणी केली होती. काही आठवड्यांपूर्वी, मुंबई उच्च न्यायालयाने आयआयटी बॉम्बेच्या दोन पीएचडी विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीनंतर ३१ जानेवारी २०२२ पर्यंत बांधकामाला स्थगिती दिली आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून मुंबईचे राजकीय आणि पर्यावरणीय क्षेत्र व्यापलेला पवई तलाव सायकल ट्रॅक प्रकल्प आता लोकसभेत चर्चेचा विषय बनला आहे.
No comments yet.