हिरानंदानी गार्डन्स, पवई येथे स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवणाऱ्या स्पावर छापा टाकत पवई पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. तीन बळीत महिलांची सुटका केली असून, या तिन्ही महिलांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. या गुन्ह्यांत स्पाचा चालक-मालक हा वॉन्टेड असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरानंदानी गार्डन येथील सायप्रेस या निवासी अपार्टमेंटमध्ये असणारे द एलिमेंटस स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती पवई पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खात्री करून घेण्यासाठी पवई पोलिसांनी तिथे एक बोगस ग्राहक पाठवून याची खात्री करून घेतली.
खात्रीलायक माहिती मिळताच सोमवारी (३० सप्टेंबर) दुपारी पवई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक (प्रशासन) गणेश पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पारटकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शोभराज सरक, एटीसी पथक आणि महिला पोलीस शिपाई यांनी स्पावर छापा टाकत स्पाच्या मॅनेजर महिलेस ताब्यात घेतले, बळीत ३ महिलांची सुटका करून त्यांना महिला सुधारगृहात पाठवण्यात आले.
“आस्थापना असिस्टंट मॅनेजर स्विटी नसन लालपारमावी (वय २८ वर्ष) हिने सदर स्पामध्ये मसाजच्या नावाखाली महिला ठेवून त्यांना वेश्याव्यवसाय करण्याकरता प्रवृत्त करून, वेश्याव्यवसाय चालविला म्हणून गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे,” असे यासंदर्भात आवर्तन पवईशी बोलताना पोउनि शोभराज सरक यांनी सांगितले.
“कलम ३,४,५ स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून, एका महिला आरोपीला अटक केली आहे, तर स्पाचा चालक-मालक प्रशांत मिस्त्री याचा शोध सुरु आहे,” असे वपोनि सोनावणे यांनी सांगितले.
No comments yet.