शाब्बास पवई पोलीस; काही तासातच शोधले प्रवाशाचे हरवलेले ५ लाख रुपये

पवई येथे आपल्या कामानिमित्त प्रवासादरम्यान एका प्रवाशाचे हरवलेले रोख पाच लाख रुपयाची रक्कम पवई पोलिसांनी काही तासात शोधून काढत त्याच्या मालकाला परत मिळवून दिली आहे. पवई पोलिसांच्या या प्रयत्नाचे आणि कर्तव्य निष्ठतेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

तक्रारदार आकाश अशोक थोरात (२९) हे बुधवारी काजूपाडा, कुर्ला पश्चिम येथून पवई येथील एल अँड टी परिसरात कामासाठी दुपारी २ वाजता बाहेर पडले होते. यावेळी आपल्या कामाचा मोबदला म्हणून ते आपल्या सोबत ५ लाख रुपयांची रोकड एका पिशवीतून घेवून जात असल्याने त्यांनी साकीनाका येथून रिक्षा पकडली.

“फिर्यादी हे साकीनाका ते एल अँड टी पवई असा रिक्षाने प्रवास करताना त्यांच्याकडे असणाऱ्या प्लॅस्टिक पिशवीतील रोख रक्कम ५ लाख घाईगडबडीत अनोळखी रिक्षामध्ये विसरले. यासंदर्भात फिर्यादी यांनी समक्ष पोलीस ठाणेस येऊन माहिती दिली.” असे पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांनी सांगतले.

सदरची रोख रक्कम ही जास्त असल्याने वपोनि सोनावणे यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश आव्हाड, आणि गुन्हे प्रकटीकरण पथक पो. ह. सुरनर, पो. ह. चव्हाण, पो. शि. वारंग, पो. शि. क्र. राठोड, पो शी. शिरसाट यांना त्वरित रिक्षाचा सुगावा लावण्याचे आदेश देण्यात आले.

गुन्हे प्रकटीकरण पथकाने याबाबत साकीनाका ते पवई दरम्यानच्या अंतरातील शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता फिर्यादी हे प्रवास करत असलेल्या रिक्षाचा नंबर त्यांना प्राप्त झाला.

“रिक्षाचा नंबर घेवून आम्ही नमूद रिक्षाचा शोध मालाड, मालवणी तसेच साकीनाका परिसरात घेतला असता सदरची रिक्षा व त्याचा चालक मोहम्मद हसन शेख हे जरीमरी भागात असल्याची माहिती प्राप्त झाली,” असे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी आव्हाड यांनी सांगितले.

शेख याच्याकडे रक्कमेबाबत चौकशी केली असता त्याने सदरची रक्कम ही त्यांच्याकडे ठेवली असल्याचे सांगितले. सदरची रक्कम ही त्याच्याकडून परत मिळवून तक्रारदार यांना पोलीस ठाण्याचे वपोनि सोनावणे यांच्या हस्ते परत देण्यात आली आहे.

यासंदर्भात बोलताना फिर्यादी थोरात यांनी आपली रक्कम परत मिळाल्याचा आनंद व्यक्त करतानाच पवई पोलिसांनी दाखवलेल्या कार्य तत्परतेचे आणि कौशल्याचे कौतुक करत त्यांचे आभार मानले.

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!