चांदिवली परिसरातील रहेजा विहार येथील एका उच्चभ्रू सोसायटीत घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात काम करणाऱ्या महिलेने मालकाच्या विश्वासाचा फायदा घेत तब्बल ७ लाख ४४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी निकलेश डायस (३७) यांनी पवई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकलेश डायस हे आपल्या कुटुंबासह चांदिवलीच्या रहेजा विहार कॉम्प्लेक्समध्ये राहतात. त्यांच्या घरात गेल्या सहा महिन्यांपासून गुडिया नावाची महिला घरकामासाठी येत होती. निकलेश आणि त्यांची पत्नी कामानिमित्त बाहेर गेल्यावर घरी त्यांची ६४ वर्षीय आई आणि ३ वर्षांची मुलगी असायची.
१४ फेब्रुवारी २०२६ रोजी निलेश आणि त्यांची पत्नी मुलीच्या शाळेतील कार्यक्रमासाठी महाकाली, अंधेरी येथे गेले होते. रात्री ८.३० च्या सुमारास घरी परतल्यानंतर निकलेश कपडे धुण्यासाठी लॉंड्री बॅगमध्ये काढताना त्यांना त्यात दागिने ठेवण्याचा बॉक्स आढळून आला. त्याला खोलून पाहिले असता रिकामा असल्याचे जाणवले. त्यांनी त्वरित दागिने ठेवलेल्या कपाटाची तपासणी केली असता, त्यात ठेवलेले सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
चोरीला गेलेल्या दागिन्यांचा तपशील
तक्रारीनुसार, चोरट्याने २ लाख रुपये किंमतीच्या ७ सोन्याच्या साखळ्या, ६४ हजारांचे सोन्याचे पेंडंट, १.२० लाखांच्या ५ अंगठ्या, ४० हजारांचे ब्रेसलेट आणि कानातले टॉप्स असा एकूण ७ लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
घरकाम करणाऱ्या महिलेवर संशय
“२ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या काळात निकलेश यांच्या घरात इतर कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीचा किंवा पाहुण्यांचा वावर नव्हता. त्यामुळे घरातील कपाटाची माहिती असणाऱ्या आणि नियमित कामाला येणाऱ्या गुडिया नावाच्या महिलेनेच हे दागिने चोरल्याचा दाट संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
पवई पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०६ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल केला असून, संशयित महिलेचा शोध सुरू आहे.
नागरिकांनी आपल्या घरी काम करणाऱ्या व्यक्तींची संपूर्ण माहिती आणि पोलीस पडताळणी केल्याशिवाय त्यांना कामावर ठेवू नये, असे आवाहन यानिमित्ताने पोलिसांनी केले आहे.
#Mumbai #Powai #CrimeNews #GoldTheft #HomeSafety #RahejaVihar #MumbaiPolice #SafetyFirst #NewsUpdate #PowaiNews




No comments yet.