पवईतील फॉरेस्ट गार्डनवर विकास आराखड्याची कुऱ्हाड; झाडे वाचवण्यासाठी शनिवारी ‘सुरक्षाबंधन’ आंदोलन

प्रस्तावित विकास योजना (डीपी) रस्त्यामुळे पवई येथील हिरानंदानी संकुलातील हिरवेगार ‘फॉरेस्ट गार्डन’ धोक्यात आले आहे. विकास आराखडा २०३४ (DP 2034) अंतर्गत या उद्यानातून डीपी रस्ता तयार करण्याचा घाट घालण्यात आला असून, त्यासाठी उद्यानातील सुमारे २०० झाडे तोडली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वृक्षतोडीविरोधात स्थानिक रहिवासी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली आहे.

महानगरपालिकेच्या पूर्व उपनगरे सर्वे विभागाने या रस्त्यासाठी डिमार्केशन (हद्द निश्चिती) पूर्ण केली असून आपला अहवाल उद्यान विभागाला सादर केला आहे. रस्ता रुंदीकरणादरम्यान उद्यानातील नेमकी किती झाडे बाधित होणार, याचा अंतिम अहवाल उद्यान विभाग तयार करत आहे. या प्रक्रियेविरोधात येत्या शनिवारी, १२ सप्टेंबर रोजी दुपारी ५ वाजता फॉरेस्ट गार्डन येथे ‘सुरक्षाबंधन आंदोलन’ पुकारण्यात आले आहे. यात उद्यानातील झाडांना राख्या बांधून त्यांच्या रक्षणाचा संकल्प करण्यात येणार आहे.

याबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपविभागप्रमुख निलेश साळुंखे म्हणाले, “जीसीसी प्रकल्पासाठी आमच्या हक्काचे फॉरेस्ट गार्डन उद्ध्वस्त होऊ देणार नाही. रस्त्याच्या नावाखाली २०० झाडांची कत्तल करण्याचा डाव आम्ही हाणून पाडू. ही झाडे वाचवण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नागरिकांनी या लढ्यात मोठ्या संख्येने उतरावे.”

पवईतील ज्येष्ठ रहिवासी आनंद शर्मा यांनीही याविषयी तीव्र संताप व्यक्त केला: “पवईचा निसर्गरम्य परिसर आणि ऑक्सिजन पुरवणारी ही हिरवळ आमचा श्वास आहे. काँक्रीटीकरणाच्या हव्यासापोटी प्रशासनाने हिरवाईवर बुलडोझर फिरवणे अत्यंत चुकीचे आहे; आम्ही हा रस्ता कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही.”

पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांच्या या विरोधामुळे आता पालिका प्रशासन आणि विकासक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

, , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!