पवई येथील प्रभाग क्रमांक १२२ येथील हिरानंदानी निवासी संकुलात असलेल्या ‘प्रमोद महाजन महापालिका उद्याना’च्या जागेतून बृहन्मुंबई महानगरपालिका नवीन विकास योजना (DP) रस्ता तयार करण्याच्या तयारीत आहे. या निर्णयाच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि स्थानिक सजग नागरिकांच्यावतीने उद्यानातील झाडांना राखी बांधून अनोखे ‘सुरक्षाबंधन’ आंदोलन छेडण्यात आले.
उद्यानाच्या लगतच उभारल्या जाणाऱ्या ‘जीसीसी’ (GCC) या खाजगी व्यावसायिक प्रकल्पासाठी महापालिकेकडून हा रस्ता प्रस्तावित करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. हा डीपी रोड उद्यानाच्या जागेतून गेल्यास तब्बल २२२ दुर्मिळ झाडांची कत्तल होईल आणि पक्षांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात येईल. तसेच नागरिकांच्या हक्काच्या उद्यानाची जागा मोठ्या प्रमाणावर कमी होणार असल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उपविभाग प्रमुख निलेश साळुंखे यांनी केले. याप्रसंगी बोलताना साळुंखे म्हणाले, “एका खाजगी मालकाच्या व्यावसायिक फायद्यासाठी महापालिकेच्या सार्वजनिक उद्यानाची जागा आणि हिरवळीचा बळी देणे अन्यायकारक आहे. पालिकेने या डीपी रोडबाबत तात्काळ पुनर्विचार करून हा निर्णय रद्द करावा, अन्यथा भविष्यात स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन तीव्र व उग्र आंदोलन केले जाईल.”
या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी विजय कुरकुटे यांनीही प्रशासनावर जोरदार निशाणा साधला. कुरकुटे म्हणाले, “पर्यावरणाचा ह्रास करून खाजगी विकासकांचे हित जपणारा हा रस्ता नागरिकांच्या आरोग्यावर आणि निसर्गावर थेट गदा आणत आहे. पवईतील नागरिक आपल्या हक्काचे मैदान आणि झाडे वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरले असून हा डीपी रोड रद्द होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.”
यावेळी समाजसेविका श्रीमती सुनीता गोहरानी यांनीही उद्यानातील दुर्मिळ वनस्पती आणि जैवविविधता वाचवण्यासाठी हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. रक्षाबंधनाचे औचित्य साधत नागरिक आणि शिवसैनिकांनी झाडांना रक्षणसूत्र बांधून त्यांचे संरक्षण करण्याचे वचन घेतले.
या आंदोलनाला पवई, चांदिवली परिसरातील नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments yet.