भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईच्या (आयआयटी बॉम्बे) परिसरात आढळून आलेल्या सुमारे सहा फूट लांबीच्या भारतीय अजगराची यशस्वीरीत्या सुटका करण्यात आली आहे. संस्थेच्या त्वरित प्रतिसाद पथकाने अजगर आढळल्याची माहिती संयुक्त वन्यजीव बचाव पथकाला दिल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.
माहिती मिळताच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल प्रोटेक्शन (ओआयपीए), अम्मा केअर फाउंडेशन (एसीएफ) आणि प्लांट अँड ॲनिमल्स वेल्फेअर सोसायटी – मुंबई (पॉज-मुंबई) यांच्या स्वयंसेवकांच्या संयुक्त बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
हा अजगर संस्थेच्या संचालकांच्या निवासस्थानाजवळील एका झाडावर आढळून आला. झाडावर असलेल्या अजगरावर कावळे वारंवार हल्ला करत असल्याने त्याला दुखापत होण्याचा धोका निर्माण झाला होता. बचाव पथकाने अजगराला सुरक्षितपणे ताब्यात घेतले आणि त्याची पशुवैद्यकीय आरोग्य तपासणी करण्यासाठी पशुवैद्यक डॉ. राहुल मेश्राम यांच्याकडे नेले.
तपासणीनंतर अजगर निरोगी असून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी योग्य असल्याचे आढळून आले. त्यानंतर महाराष्ट्र वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.
या बचावकार्याचा समन्वय करणाऱ्या निशा कुंजु यांनी सांगितले की, “विशेषतः शहरी भागात संकटात सापडलेल्या वन्यजीवांच्या संरक्षणासाठी नागरिकांनी वेळीच माहिती देणे आणि तातडीने योग्य मदत मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “नागरिकांनी स्वतःहून वन्यजीवांना पकडण्याचा किंवा त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न करू नये. वन्यजीव संकटात आढळल्यास किंवा वन्यजीवांची तस्करी होत असल्याचा संशय असल्यास तातडीने संबंधित यंत्रणांना माहिती द्यावी.”
वन्यजीव बचाव व तस्करीविरोधी दूरध्वनी क्रमांक हॅलो फॉरेस्ट १९२६, एसीएफ पॉज-मुंबई ९८३३४८०३८८ संपर्क साधावा



No comments yet.