रक्षाबंधनानिमित्त कुटुंब बाहेर गेल्याची संधी साधून बंद घराचे कुलूप तोडून लाखो रुपयांचे दागिने लंपास करणाऱ्या चार सराईत चोरट्यांना पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवघ्या १० तासांच्या आत गजाआड केले आहे. पोलिसांनी चोरीस गेलेले संपूर्ण सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.
अल्ताफ उर्फ अल्टर युसुफ खान (वय २३), प्रणित उर्फ सोन्या वने (वय २६), ऋषिकेश पवार (वय १९) आणि विघ्नेश गावडे (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
नेमकी घटना काय?
पवईतील मोरारजी नगर येथे राहणारे तक्रारदार राहुल झा २९ ऑगस्टला रक्षाबंधनासाठी कुटुंबीयांसह भिवंडी येथे गेले होते. १ सप्टेंबर रोजी घरी परतल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा तोडून कोणीतरी आता घुसून घरात चोरी केली असल्याचे समोर आले. त्यांनी तत्काळ पवई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०५(अ) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल केला.
“अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट आणि बॅगा फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ३ लाख ५७ हजार ९३३ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता,” असे पवई पोलिसांनी सांगितले.
कारवाईबाबत माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत म्हणाले, “सणासुदीच्या काळात घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांवर आमचे बारीक लक्ष आहे. फिर्यादीने गुन्हा नोंदवताच आमच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व खबऱ्यांच्या आधारे कौतुकास्पद कामगिरी करत अवघ्या १० तासांत आरोपींना पकडले. नागरिकांनी बाहेरगावी जाताना मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात आणि पोलिसांना पूर्वकल्पना द्यावी.”
तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रणोद माने यांनी सांगितले, “सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक खबऱ्यांकडून मिळालेल्या अचूक माहितीमुळे आरोपींचा माग काढणे शक्य झाले. आरोपींकडून चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आम्हाला यश आले आहे.”
वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रणोद माने, पोलीस हवालदार तानाजी टिळेकर, आदित्य झेंडे, संदीप सुरवाडे, पोलीस शिपाई सूर्यकांत शेट्टी, संदीप राठोड व प्रकाश शिंदे यांनी गुन्हा उघडकीस आणला.



No comments yet.