पादचाऱ्यांची सोनसाखळी चोरी करणारा सराईत चोरटा जेरबंद; पवई पोलिसांची धडक कारवाई

file photo

पवई येथील हिरानंदानी परिसरात नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी पायी जाणाऱ्या एका महिलेची सुमारे २ लाख २५ हजार रुपयांची सोन्याची चैन जबरीने खेचून मोटारसायकलवरून पसार झालेल्या आरोपीला पवई पोलिसांनी शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. आकाश बंडू खाटीकमोरे (वय २८, रा. घाटकोपर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्सोवा येथील रहिवासी शितल बुमराह (वय ४८) या ६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास पवई येथे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी आल्या होत्या. त्या हिरानंदानी परिसरातील पोद्दार स्कूलसमोरील रोडवर उभे असताना, मोटारसायकलवरून दोन अनोळखी तरुण अचानक त्यांच्या जवळ आले. क्षणार्धात त्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची (२ लाख २५ हजार रुपये किमतीची) सोन्याची चैन जबरीने खेचली आणि वेगाने पसार झाले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पवई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०९(४) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.

सीसीटीव्ही आणि खबऱ्यांच्या मदतीने आरोपी गजाआड

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले असता आरोपींच्या हालचाली स्पष्ट झाल्या. “फुटेजच्या तांत्रिक विश्लेषणासह गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे तपास पथकाने कुर्ला येथील विभिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचला. तेथून मुख्य आरोपी आकाश खाटीकमोरे याला मोटारसायकलीसह शिताफीने ताब्यात घेण्यात आले,” असे पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांनी सांगितली.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आकाश याने आपल्या साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून, चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम सुरू आहे.

सदर यशस्वी कामगिरी पोलीस उपआयुक्त दत्ता नलावडे, सहायक पोलीस आयुक्त दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांच्या नेतृत्वात पोउपनि नवनाथ ढेकळे, सपोनि प्रणोद माने, पोउपनि तायडे, पोउपनि राहुल पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. या टोळीने आणखी काही जबरी चोऱ्या केल्या आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.

, , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!