पवईतील महावीर क्लासिक इमारतीत गुरुवारी (३० ऑक्टोबर) वेब सिरिजच्या ऑडिशनसाठी आलेल्या १७ मुलांसह २० जणांना खोलीत ओलीस ठेवणारा रोहित आर्या नामक ४७ वर्षीय व्यक्ती पोलिसांच्या चकमकीत ठार झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या सोबतच्या पोलिसांच्या वाटाघाटी अयशस्वी झाल्यानंतर आर्याने पोलिसांवर चालवलेल्या गोळीच्या प्रतिउत्तरादाखल झाडलेली गोळी त्याच्या छातीत लागली. त्याचा सहाय्यक कर्मचारी, रोहनराज आहेर, एक मध्यमवयीन पुरुष आणि एक ६५ वर्षीय महिला या चकमकीत जखमी झाली आहे.
आर्या याने नियोजित केलेल्या वेब सिरीजसाठी मुलांना ऑडिशनसाठी आमंत्रित केले होते. कोल्हापूर, नवी मुंबई, सातारा, सांगली आणि महाराष्ट्राच्या इतर भागातील रहिवासी असलेल्या या मुलांना वेब सिरीजचे चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी पवई येथे अंतिम ऑडिशनसाठी बोलावण्यात आले होते. तो गेल्या चार दिवसांपासून ऑडिशन घेत होता आणि गुरुवारी शेवटचा दिवस होता.
“आर्यने नऊ मुली आणि आठ मुलांना (१२ ते १५ वयोगटातील) आणि तीन सहाय्यक कर्मचाऱ्यांना – दोन महिला (एक मध्यमवयीन आणि ६५ वर्षांची) आणि एक पुरूष (मध्यमवयीन) – ओलीस ठेवले होते.” असे एक वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
‘ऑडिशनसाठी त्याने कुठे जाहिरात प्रसिद्ध केली आहे याची माहितीही टीम गोळा करत आहे. त्याने काही मुलांना एका खोलीत बंदिस्त ठेवले होते तर इतरांना त्याच्यासोबत ठेवले होते,” असे पवई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांनी सांगितले.

मुख्य फोटो – घटनास्थळी दाखल झालेल मुंबई पोलिसांच क्यूआरटी पथक; चौकट- पवई पोलीस ठाण्याचे दहशतवादविरोधी सेलचे (एटीसी) अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे
“पोलिसांनी आत असलेल्या आणि झटक्याची समस्या असलेल्या आणि गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकणाऱ्या एका मुलीच्या पालकांच्या मदतीने आरोपीशी संपर्क साधत समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही त्याने ऐकण्यास नकार दिला. तो ठाम राहिला आणि विनंतीचे पालन करण्यास तयार नव्हता,” असे पोलिसांनी सांगितले.
सह पोलिस आयुक्त (एल अँड ओ) सत्यनारायण चौधरी म्हणाले, “प्राथमिकदृष्ट्या संशयिताने काही कामाच्या थकबाकीसाठी मुलांना ओलीस ठेवण्यामागील हेतू असल्याचे दिसून येत आहे.”
पोलीस उपायुक्त (परिमंडळ १०) दत्ता नलावडे म्हणाले: “दुपारी १:३० वाजता पवई पोलिस स्टेशनला माहिती मिळाली की एका व्यक्तीने महावीर क्लासिक इमारतीत १७ मुलांना ओलीस ठेवले आहे. मुंबई पोलिसांच्या पथकाने बचाव मोहीम राबवली आणि सर्व मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढले. मुलांना वाचवताना कारवाईदरम्यान तो व्यक्ती जखमी झाला, त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले आणि डॉक्टरांनी तपासून दाखल करण्यापूर्वी त्याला मृत घोषित करण्यात आले.”
आर्यने गुरुवारी सोशल मीडियावर स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्डिंग प्रसारित केला तेव्हा ही घटना उघडकीस आली.
इमारतीतील एका व्यक्तीने पहिल्या मजल्यावरून मुलांच्या रडण्याचा आवाज येत असून, त्यांना कोंडून ठेवले गेले असल्याचे समजल्यावर, त्या घटनेची माहिती पवई पोलिसांना दिली. मुलाचे पालक इमारतीच्या बाहेर खालीच उभे होते.
सुरुवातीला, आर्याने पोलिस पथकाशी संवाद साधत त्याच्या काही मागण्या पूर्ण करायच्या आहेत असे सांगितले. परंतु त्याने शेवटपर्यंत संपूर्ण प्रकरण उघड केले नाही. अडीच तासांपर्यंत टीम त्याच्याशी बोलणी करण्याचा प्रयत्न करत होती. अखेर, आर्यने पोलिसांच्या संवादावर विश्वास ठेवत नाही असा दावा केल्यानंतर टीमने आत जाण्याचा निर्णय घेतला,” असे अधिकारी म्हणाले.
बाथरूमच्या खिडकीतून खोलीत प्रवेश करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना आढळले की मजल्यांवर ज्वलनशील रसायने फवारण्यात आली आहेत. पोलिसांनी सांगितले की, त्याच्या कृत्यामागील हेतू अस्पष्ट राहिला आहे. जरी प्रथमदर्शनी ते कामाच्या थकबाकीशी संबंधित असल्याचे दिसून आले असले तरी आमचा तपास सुरु आहे.
पवई पोलिस आर्यविरुद्ध एफआयआर नोंदवत आहेत आणि त्याच्या कुटुंबाबद्दल आणि तो कुठून आला याबद्दल माहिती गोळा करत आहेत. ते त्याच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांचे जबाब देखील नोंदवत आहेत, जे चार दिवसांपूर्वी त्याच्यासोबत मुंबईला आले होते.
पुढील तपासासाठी हे प्रकरण मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. आर्याने एअर गनमधून गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या प्रतीउत्तरात त्याला चकमकीत ठार मारण्यात आले. पवई पोलिस ठाण्यातील दहशतवादविरोधी सेलचे (एटीसी) अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी टीमसोबत आत घुसून झालेल्या चकमकीत आर्यवर गोळीबार केला होता. पवई पोलीस त्यांचा जबाब नोंदवत आहेत.




No comments yet.