मुंबई उपनगरातील हिरवे फुप्फुस मानल्या जाणाऱ्या पवई येथील ‘स्वर्गीय प्रमोद महाजन वन उद्याना’च्या अस्तित्वावर आता टांगती तलवार निर्माण झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) विकास नियोजन आराखडा २०३४ (DP 2034) अंतर्गत या नैसर्गिक उद्यानातून सुमारे १३.४ मीटर म्हणजेच ४० फुटी रुंद विकास नियोजन रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. या नियोजित रस्त्यामुळे उद्यानातील शेकडो जुने वृक्ष तोडले जाण्याची भीती व्यक्त होत असून, याविरोधात स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि युवासेनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पवईतील हिरानंदानी परिसरातील ‘लेक कॅसल’ इमारतीमागे मौजे पवई, न.भू.क्र. २३/ब/२ येथे हे निसर्गरम्य वन उद्यान वसलेले आहे. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेला हा संपूर्ण भूखंड मूळतः उद्यानासाठीच पूर्णपणे आरक्षित आहे. आजच्या घडीला मुंबई शहरात वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे निसर्गाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असताना, पवईला शुद्ध प्राणवायू देणारे हे महत्त्वाचे हरित क्षेत्र मानले जाते. येथे हजारो देशी झाडे, दुर्मिळ वनस्पती आणि पक्षांचा मोठा किलबिलाट पाहायला मिळतो. स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी, सकाळच्या निवांत फेरफटक्यासाठी तसेच निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी हे उद्यान जीवनवाहिनी ठरले आहे. मात्र, उद्यानातून थेट रस्ता नेण्याच्या विकास आराखड्यातील तरतुदीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
या गंभीर समस्येवर युवासेनेचे विक्रोळी विभाग युवा अधिकारी विजय कुरकुटे आणि शिवसैनिक अमोल चव्हाण हे शासन दरबारी गेली वर्षभर जोरदार पाठपुरावा करत आहेत. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री, महापालिका आयुक्त, नगरविकास खाते आणि पर्यावरण विभागाकडे तसेच संबंधित प्राधिकरणांना पत्र पाठवून हा विनाशकारी रस्ता तातडीने रद्द करण्याची अथवा पर्यायी मार्गाने वळवण्याची आग्रही मागणी केली आहे. रस्त्यांचे मार्ग बदलता येऊ शकतात, मात्र वर्षानुवर्षे जपलेली समृद्ध जैवविविधता पुन्हा निर्माण करता येत नाही; त्यामुळे विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी देऊ नये, अशी परखड भूमिका आवर्तन पवईशी बोलताना कुरकुटे यांनी मांडली.
नागरिकांनी पालिकेच्या कारभारावर अनेक टोकदार प्रश्न उपस्थित केले आहेत. हा रस्ता नक्की कोणाच्या फायद्यासाठी आणि कोणत्या सार्वजनिक निकडीसाठी आखण्यात आला आहे? प्रस्तावित प्रकल्प किंवा खाजगी व व्यावसायिक विकास प्रकल्पांना लाभ मिळवून देण्यासाठी तर ही जागा हडप केली जात नाही ना? असा संशय स्थानिक व्यक्त करत आहेत. तसेच उपलब्ध पर्यायी जागांमधून हा मार्ग न काढता नैसर्गिक बागेवरच कुऱ्हाड का चालवली जात आहे? याबाबत स्पष्टीकरण मागितले असून अंतिम निर्णय घेण्यापूर्वी तातडीने जाहीर सुनावणी घेण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे.
पवई ‘अॅडव्हान्स्ड लोकॅलिटी मॅनेजमेंट’चे (ALM) मिलन भट यांनी सांगितले की, २०१९ मधील सुधारणांद्वारे हा रस्ता आराखड्यात समाविष्ट करण्यात आला होता. तसेच प्रस्तावित ‘ग्लोबल सेलिब्रेशन सेंटर’ (GCC) किंवा इतर खाजगी व सार्वजनिक प्रकल्पांसाठी हा मार्ग केला जात आहे का, अशी शंका उपस्थित करत पालिकेकडे सार्वजनिक सुनावणी घेण्याची मागणी केली आहे.
या तक्रारींची दखल घेत मुंबई महापालिकेच्या विकास नियोजन (DP) मुख्य अभियंता कार्यालयाने कार्यवाही सुरू केली आहे. उद्यानाला लागून असलेल्या नगर भूमापन क्रमांक २३ए(भाग), २६ए(भाग) आणि २७(भाग) वरील झोपडपट्टी पुनर्वसन (SRA) योजनेच्या विकासकाला रस्त्याचे प्रत्यक्ष जागेवर सीमांकन (Demarcation) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सीमांकनानंतर रस्त्याचा मार्ग बदलण्याच्या (Realigning) शक्यतेची तांत्रिक तपासणी केली जाईल. तसेच रस्त्याच्या टप्प्यात बाधित होणाऱ्या झाडांची मोजणी व यादी सादर करण्याचे निर्देश उद्यान अधीक्षकांना दिले आहेत.
प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन हे उद्यान वाचवावे, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारू, असा इशारा पवईकरांनी दिला आहे.



No comments yet.