पवईतील साकीविहार रोड परिसरातील एका घरात काम करण्यासाठी ॲपच्या माध्यमातून आलेल्या महिला कामगाराने घरात हात साफ केला आहे. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार स्वप्नील लघाटे हे साकीविहार परिसरात आपल्या कुटुंबासह राहतात. २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ११:४० वाजताच्या सुमारास तक्रारदाराच्या पत्नीने ‘अर्बन कंपनी’ (Urban Company) ॲपच्या माध्यमातून घरकामासाठी एका महिलेला बोलावले होते.
योगिता बोरसे असे नाव असलेली महिला या ठिकाणी कामासाठी आली आणि दुपारी १२:४५ वाजेपर्यंत घरातील काम पूर्ण करून निघून गेली.
पूजा करताना चोरी उघडकीस
दुसऱ्या दिवशी सकाळी १०:०० वाजता जेव्हा तक्रारदाराच्या आई देवघरात पूजेसाठी गेल्या, तेव्हा त्यांना देवघरातील गणपतीची आणि बाळकृष्णाची चांदीच्या मूर्ती गायब असल्याचे निदर्शनास आले. घरातील सदस्यांकडे विचारपूस केली असता, या २४ तासांच्या कालावधीत योगिता बोरसे या महिलेशिवाय कोणतीही बाहेरील व्यक्ती घरात आली नव्हती. घरात सर्वत्र शोध घेऊनही मूर्ती सापडल्या नाहीत.
त्यानंतर तक्रारदाराच्या पत्नीने संशयित महिला हिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने फोन स्वीकारला नाही. तसेच कंपनीच्या इतर कामगारांकडे चौकशी केली असता, सदर महिलेबाबत यापूर्वीही चोरीच्या संशयास्पद कृत्यांची माहिती समोर आली.
४०,००० रुपयांची मालमत्ता गायब
चोरीस गेलेल्या वस्तूंमध्ये सुमारे २०० ग्रॅम वजनाची चांदीची गणपतीची मूर्ती (किंमत ₹३०,०००) आणि ५० ग्रॅम वजनाची चांदीची बाळकृष्णाची मूर्ती (किंमत ₹१०,०००) अशा एकूण ४०,००० रुपयांच्या दागिन्यांचा/मूर्तींचा समावेश आहे.
पोलीस कारवाई
घरात चोरी झाल्याची खात्री पटल्यानंतर स्वप्नील यांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पवई पोलिसांनी ३० ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



No comments yet.