अल्पवयीन मुलाला दुचाकी चालवण्यास देणे पडले महागात; पोलिसांनी दुचाकी जप्त करत वडिलांवर दाखल केला गुन्हा

प्रातिनिधिक छायाचित्र

विनापरवाना, अत्यंत वेगाने दुचाकी चालवणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलावर कारवाई करत साकीनाका वाहतूक पोलिसांनी त्याची मोटारसायकल जप्त केली आहे. या सोबतच अल्पवयीन मुलाला वाहन चालवण्यास परवानगी दिल्याप्रकरणी त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

साकीविहार रोडवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल संजय मगर आणि गोपाळ पाटील बुधवारी आपले कर्तव्य बजावत होते. दुपारी सुमारे ११:५५ वाजताच्या सुमारास पश्चिम लेनवर एक अल्पवयीन मुलगा भरधाव आणि निष्काळजीपणे दुचाकी चालवत असल्याचे त्यांनी पाहिले. त्वरित मुलाला थांबवून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव युसूफ कादरी असल्याचे त्याने संगीतले. तसेच त्याच्याकडे वाहन चालवण्याच्या कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले.

यावेळी कर्तव्यावर असणारे पोलीस उपनिरीक्षक संदीप चव्हाण यांनी मुलाचे वडील सरफराज कादरी यांच्याशी संपर्क साधून गाडीच्या कागदपत्रासह मुलाच्या वयाच्या कागदपत्रांसोबत साकीनाका वाहतूक पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले.

“वडिलांनी सादर केलेल्या जन्मदाखल्यानुसार मुलाचा जन्म ऑक्टोबर २०११ रोजी झाला असून, तो अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले,” असे पोलिसांनी सांगितले.

वडिलांसह मुलावर कायदेशीर कारवाई:

वडिलांवर गुन्हा: मुलाकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसतानाही त्याला दुचाकी चालवण्यास दिल्याबद्दल वडिलांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास वडिलांना ३ वर्षांचा तुरुंगवास आणि २५,००० रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. मोटार वाहन कायद्याच्या कलम २०७ अंतर्गत दुचाकी जप्त करण्यात आली.

अल्पवयीन मुलावर निर्बंध: कायद्यानुसार, संबंधित अल्पवयीन मुलाला वयाची २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत ‘लर्निंग लायसन्स’ (शिकावू परवाना) काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाई बाल न्याय मंडळाकडे (Juvenile Justice Board) सोपवण्यात येणार आहे.

अल्पवयीन मुले रस्त्यांवर भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे वाहने चालवत असल्याने रस्ते अपघातांमध्ये वाढ झाली आहे. वाहतूक विभागाने नागरिकांमध्ये जनजागृती करून देखील पालक आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देत असल्याने पोलिसांनी आता कडक पाउले उचलण्यास सुरुवात केली आहे.

यासंदर्भात बोलताना वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले कि, “अल्पवयीन मुलांना (१८ वर्षांखालील) वाहने चालवण्यास देणे हा मोटार वाहन कायद्यानुसार अत्यंत गंभीर आणि दंडनीय गुन्हा आहे. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र ट्रॅफिक पोलीस या विरोधात सातत्याने कडक मोहीम राबवत असून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जात आहे.”

जर तुम्ही तुमच्या अल्पवयीन पाल्याला दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवण्यास दिले, तर मोटार वाहन कायदा कलम १९९ (अ) नुसार खालीलप्रमाणे कडक कारवाई होऊ शकते:

  • पालकांना किंवा वाहन मालकाला शिक्षा: पाल्याच्या या चुकीसाठी थेट पालकांना किंवा वाहनाच्या मालकाला जबाबदार धरून ३ वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि २५,००० रुपये दंड होऊ शकतो.
  • लायसन्स मिळण्यात अडथळा: संबंधित अल्पवयीन मुलाला किंवा मुलीला वयाची २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स (चालक परवाना) मिळणार नाही.
  • वाहनाची नोंदणी रद्द: ज्या वाहनाचा वापर केला गेला आहे, त्या वाहनाचे रजिस्ट्रेशन (नोंदणी) रद्द केले जाऊ शकते.
  • न्यायालयीन कारवाई: अल्पवयीन मुलांकडून अपघात किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास हे प्रकरण थेट ‘जुवेनाईल जस्टिस बोर्ड’ (Juvenile Justice Board) आणि न्यायालयामार्फत चालवले जाते.

अपवाद: कायद्यानुसार केवळ १६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना ५० सीसी (cc) पेक्षा कमी क्षमता असलेली विना-गिअरची वाहने चालवण्याची परवानगी मिळू शकते, परंतु त्यासाठीही रीतसर परवाना आवश्यक असतो.

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!