पवईत भीषण अपघात: बोलेरो पिकअपच्या धडकेत सुरक्षारक्षकाचा मृत्यू; चालक फरार

प्रातिनिधिक छायाचित्रचांदिवली फार्म रोड परिसरात शनिवारी दुपारी एक भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो पिकअप गाडीने दिलेल्या धडकेत ४० वर्षीय अजय राजेंद्र सिंग या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक आपले वाहन सोडून घटनास्थळावरून फरार झाला.

नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, मृत अजय सिंग हे चांदिवली परिसरात राहत असून, हिरानंदानी परिसरात सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी २०२६) दुपारी १२:३० च्या सुमारास ते चांदिवली फार्म रोडवरील लेक होम जवळून जात असताना, ‘बोलेरो पिकअप’ (क्रमांक: एमएच ०३ सीपी ३१७९) या गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, अजय यांच्या चेहऱ्याला आणि गळ्याला गंभीर इजा झाली.

कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर अजय यांची पत्नी मिना सिंग या घरकाम करतात. घटनेच्या वेळी त्या कामावर होत्या. शेजारी राहणाऱ्या महिलेने त्यांना फोनवरून अपघाताची माहिती देत अजय यांना हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये घेवून गेल्याचे सांगितले. मिना यांनी तात्काळ हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली, परंतु तिथे पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी अजय यांना ‘दाखलपूर्व मृत’ घोषित केले. अजय यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबाचा आधार हरपला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांत तक्रार दाखल मिना यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बोलेरो पिकअप चालकाने आपले वाहन अत्यंत हयगयीने आणि बेजबाबदारपणे चालवून अजय यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला असल्याची तक्रार पवई पोलिसांनी दाखल केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अपघात झाल्यानंतर जखमीला मदत करण्याऐवजी चालक आपली गाडी तिथेच सोडून पळून गेला. या प्रकरणी पवई पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

, , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!