चांदिवली परिसरात राहणाऱ्या एका ७६ वर्षीय वृद्ध महिलेची व्यवसाय गुंतवणूक आणि प्राप्तिकर परताव्याच्या (Income Tax Refund) नावाखाली १.७१ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पवई पोलिसांनी एका भाडेकरू दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोहितकुमार बिसु आणि त्याची पत्नी सुषमा गुरुंग अशी आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार प्रिया स्वरूप (७६) या चांदिवली येथील रहिवासी असून, त्या एका खाजगी कंपनीतून निवृत्त झाल्या आहेत. आरोपी मोहितकुमार बिसु हा त्यांच्या पवईतील हिरानंदानी गार्डन्स येथील फ्लॅटमध्ये ऑगस्ट २०२२ पासून भाड्याने राहत होता. २०२४ मध्ये भाडेकरार संपल्यानंतर तो पुन्हा एका वर्षासाठी वाढवण्यात आला होता. यादरम्यान बिसुने स्वरूप यांचा विश्वास संपादन केला.
२०२३ मध्ये बिसुने स्वरूप यांना तांदूळ व्यापारात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवले. यासाठी त्याने त्यांच्या भावाच्या नावाने ‘डेम्पो एंटरप्राइजेस’ नावाची संस्था स्थापन केली आणि एका करारावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. मात्र, त्या करारावर स्वतः स्वाक्षरी केली नाही, त्याची प्रतही स्वरूप यांना दिली नाही.
या व्यवसायासाठी डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ दरम्यान स्वरूप यांनी ३६.५ लाख रुपयांची गुंतवणूक केली. परंतु, नफा न मिळाल्याने विचारणा केली असता बिसुने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.
याचदरम्यान स्वरूप यांनी बेंगळुरू आणि पवई येथील आपल्या दोन मालमत्ता विकल्या होत्या, ज्यातून त्यांना १.९० कोटी रुपये मिळाले होते. या व्यवहारावर त्यांनी २४ लाख रुपये ‘इन्कम टॅक्स’ भरला होता. ही बाब समजताच बिसुने हा टॅक्स परत मिळवून देतो असे सांगून त्यासाठी खर्च लागेल असे भासवले आणि त्यांच्याकडून अधिक पैसे उकळले, मात्र परतावा कधीच मिळाला नाही.
बँक खात्यातून परस्पर व्यवहार
आरोपीने तक्रारदार जेष्ठ नागरिक असल्याने त्यांच्या वयाचा फायदा घेत त्यांच्या मोबाईल बँकिंगचे तपशील मिळवले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून १.७१ कोटी रुपये स्वतःची कंपनी ‘वैष्णव एंटरप्राइजेस’ आणि पत्नीच्या खात्यात एनईएफटी (NEFT) व चेकद्वारे वळवले. इतकेच नव्हे तर, त्याने त्यांच्या ॲक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डचाही गैरवापर केला.
याप्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच स्वरूप यांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.



No comments yet.