तरुणाईला ड्रग्जपासून वाचवण्यासाठी शिवसेना मैदानात; पवईतील ‘अड्ड्यांवर’ पोलिसांची करडी नजर

शांत आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पवई परिसराला सध्या अंमली पदार्थांच्या विळख्याने ग्रासले आहे. येथील उधळली जाणारी तरुणाई आणि उघडपणे चालणारे अंमली पदार्थांचे व्यवहार पाहून अखेर शिवसेनेने (उबाठा) ‘मैदानात’ उतरण्याचा निर्णय घेतला आहे. “पवईतील तरुण नशेच्या आहारी गेले आहेत, हे अत्यंत गंभीर आहे. पोलिसांनी यावर कायमस्वरूपी बंदोबस्त करावा,” अशा शब्दांत आमदार सुनील राऊत यांनी प्रशासनाकडून ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे.

काही दिवसांपासून स्थानिक नागरिकांनी ड्रग्ज सेवनाचे व्हिडिओ आणि फोटो पुराव्यासह शिवसेनेकडे सोपवले होते. त्यानंतर शिवसेनेने आपली ‘अंमली पदार्थ विरोधी मोहीम’ युद्धपातळीवर तीव्र केली आहे. पवईतील हनुमान रोड, गरीब नगर, लिव्हो चर्च परिसर, इंदिरा नगर, दुर्गादेवी शर्मा उद्यान, गौतम नगर आणि ज्ञान मंदिर शाळा यांसारख्या संवेदनशील भागांत निलेश साळुंखे, नितीन भावसार, महेंद्र गुर्जर, नारायण साळुंखे, राकेश पांडे, दीपक शिंदे, संतोष पाटकर, उत्तम देसाई या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांनी प्रत्यक्ष फेरफटका मारून परिस्थितीचा आढावा घेतला.

उद्याने आणि शाळांच्या परिसरातही ड्रग्जचा वावर वाढल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गंभीर प्रश्नावर शिवसेना उपविभाग प्रमुख (उबाठा) निलेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांची भेट घेतली. शिवसैनिकांनी यावेळी पोलिसांना लेखी तक्रार देऊन कडक कारवाईची मागणी केली.

पोलिसांनीही या मोहिमेची तातडीने दखल घेत संबंधित ‘हॉटस्पॉट्स’वर गस्त वाढवली असून गुन्हेगारांना अद्दल घडवण्याचे आश्वासन दिले आहे. “पवईला ड्रग्जमुक्त करेपर्यंत ही लढाई थांबणार नाही,” असा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे.

भविष्यातही अशाच प्रकारे पोलिसांच्या मदतीने ठिकठिकाणी छापे टाकले जाणार असून, ड्रग्ज माफियांचे कंबरडे मोडण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे.

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!